व्हीटीयूचा नवा उपक्रम : आर्किटेक्चर विद्यार्थ्यांचाही समावेश
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) ने त्यांच्या सर्व पदवी अभ्यासक्रमातील शाखांमध्ये एक वर्षाचे इंटर्नशीप अनिवार्य केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. ऑगस्टपासून अंतिम वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करावी लागणार आहे. याची वेबबेस्ड नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. राज्यात व्हीटीयूशी 215 इंजिनिअरिंग व आर्किटेक्चर कॉलेज संलग्न आहेत. यापैकी 39 स्वायत्त, 16 सरकारी इंजिनिअरिंग, 15 आर्किटेक्चर स्कूल आहेत. सध्या तीन लाखांहून अधिक विद्यार्थी टेक्निकल शिक्षण घेत आहेत. इंजिनिअरिंग व इतर कॉलेजमधील 923 विभागांना व्हीटीयूअंतर्गत संशोधन केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून ऑनलाईन इंटर्नशीप नोंदणी प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली आहे. हे पोर्टल विद्यार्थ्यांना कंपन्यांशी थेट जोडून इंटर्नशीपची संधी उपलब्ध करून देणार आहे. अंदाजे 80 हजार विद्यार्थी इंटर्नशीप घेण्याची अपेक्षा आहे. गुणवत्ता आणि शिक्षणानंतर नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्यापूर्वीची जबाबदारी याबाबत इंटर्नशीप महत्त्वाची ठरणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. या प्लॅटफॉर्ममुळे विद्यार्थ्यांना देशासह परदेशातील कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी व्हीटीयूच्या इंटर्नशीप पोर्टलवर नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविला जात असून भविष्यात याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा विश्वास कुलगुरु प्रा. विद्याशंकर यांनी व्यक्त केला.









