पश्चिम बंगालमध्ये उग्र निदर्शने, पिडीतेच्या मातेचे राज्य सरकार आणि पोलिसांविरोधात गंभीर आरोप
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या संतापजनक घटनेच्या वर्षपूर्तीप्रसंगी राज्यभरात उग्र निदर्शने करण्यात आली आहेत. पिडीत डॉक्टरच्या मातापित्यांनीही या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप पिडीतेच्या मातेकडून करण्यात आला आहे.
या निदर्शनांचे आयोजन भारतीय जनता पक्ष आणि अनेक सामाजिक संस्थांकडून करण्यात आले होते. डॉक्टरांच्या संघटनाही या निदर्शनांमध्ये समाविष्ट होत्या. या प्रसंगी पिडीत महिला डॉक्टरच्या माता-पित्यानी पोलिसांच्या कथित दंडेलीवर टीका केली आहे. आपल्याला निदर्शनात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. मारहाण करण्यात आली. आपल्या डोक्याला गंभीर जखम झाली असून आपल्या बांगड्या फोडण्यात आल्या, असा आरोप या मातेने केला आहे.
चलो नबाना
चलो नबाना या अभियानाच्या अंतर्गत या निदर्शशांचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगालच्या सचिवालयाला ‘नबाना’ असे संबोधण्यात येते. या सचिवालयावर सहस्रावधी नागरीकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. या मोर्चात पिडीत महिला डॉक्टरचे मातापिता आणि कुटुंबियही सहभागी होते. सचिवालयाभोवती प्रशासनाने बॅरिकेड उभ्या केल्या होत्या. निदर्शकांनी या बॅरिकेडस् ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. तरीही जमावाला पांगविण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसून आले.
नागरीकांना आवाहन
राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी जनतेला या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने समाविष्ट होण्याचे आवाहन केले होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे ध्वज आणू नयेत, अशी सूचना करण्यात आली होती. या निदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आपल्या कन्येला अद्यापही न्याय मिळाला नसून आम्ही तो मिळविण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करीत राहू, असा निर्धार पिडीतेच्या मातापित्यांनी निदर्शने पार पडल्यानंतर व्यक्त केला आहे.
लाठीमाराचा निषेध
आमची निदर्शने अत्यंत शांतपणे चाललेली असताना राज्य पोलिसांनी आंदोलकांना भडकाविण्यासाठी विनाकारण लाठीहल्ला केला. या लाठीमारात पक्षाचे 100 हून अधिक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. ममता बॅनर्जी सरकारने ताळतंत्र सोडले असून विरोधकांचे दमन चालविले आहे, असा आरोप अधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि विधानसभेचे आमदार यांनाही लाठीचा प्रसाद मिळाला आहे.
काय होते प्रकरण…
कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टच्या मध्यरात्री पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका महिला डॉक्टरवर महाविद्यालयाच्या परिसरात बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आली होती. प्रथम या प्रकरणाचा तपास करण्यात पश्चिम बंगाल पोलिसांनी हलगर्जीपणा केला, असा आरोप आहे. त्यामुळे महत्वाचे पुरावे नष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची स्वत:हून नोंद घेऊन तपास सीबीआयकडे सोपविला होता. या प्रकरणी संजय राय नामक आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात सीबीआयने अभियोग चालविला होता. त्याला कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
आजही संतापाची धग
ड सारा देश हादरवून टाकणाऱ्या बलात्कार-हत्या प्रकरणावर आजही संताप
ड अद्यापही खरा न्याय न मिळाल्याचा पिडीत डॉक्टरच्या मातापित्यांचा आरोप
ड विविध संघटनांकडून आयोजित निदर्शनांना नागरीकांनी दिला मोठा प्रतिसाद
ड पिडीतेच्या मातापित्यांचाही निदर्शनांमध्ये सहभाग, अनेक नेत्यांची उपस्थिती









