एक पुरुष आणि त्याच्या एकाहून अधिक पत्नी असणे बेकायदेशीर असते याची आपल्याला माहिती आहे. काही धर्म किंवा परंपरांच्या अनुसार दोन किंवा अधिक पत्नी असण्याचा पुरुषाला अधिकार असतो. तथापि, क्वचित काही जमातींचा अपवाद वगळता एक पत्नी आणि दोन किंवा अधिक पती असा प्रकार सहसा आढळत नाही. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील गूंजा नामक एका महिलेला असे दोन पती आहेत. हे तिघेही एकाच घरात राहतात.
गूंजाचा विवाह सनातन पोद्दार नामक तरुणाशी 2020 मध्ये झाला होता. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे होत असताना गूंजा हिचे तिच्या दीराशी प्रकरण सुरु झाले. त्यामुळे तिच्या पतीने तिला स्वत:पासून अलग केले. नंतर तिने तिच्या दीराशी विवाह केला. तिचा प्रथम पतीशी घटस्फोट झालेला नाही. तरीही तिने हा दुसरा विवाह केला. अशाप्रकारे तिला एकाचवेळी दोन पती आहेत. पण या संबंधांना आता वेगळे वळण मिळाले आहे. पती झालेल्या तिच्या दीराचे आता दुसरे लग्न करण्याची तयारी केली जात आहे. हे कानावर पडताच ती दुसऱ्या पतीविरोधात धरणे देऊन बसली आहे. आता हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे गेले आहे. तथापि, हा प्रकार इतका विचित्र आहे, की पोलिसांनाही नेमके काय करायचे, हे समजेनासे झाले आहे. त्यामुळे लेखी तक्रार आल्याशिवाय आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी हे प्रकरण आपापसातच मिटविण्याचा सल्ला या कुटुंबाला दिला आहे. दुसरी महत्वाची बाब अशी की आता ही महिला गर्भवती आहे. तथापि, तिच्या दोन पतींपैकी कोणीही संभाव्य अपत्याचे उत्तरदायित्व स्वीकारण्यास पुढे येत नाही, अशी तिची परिस्थिती झाली आहे.









