गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा : वर्षा उसगांवकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
पणजी : गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्dयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चित्रपट निर्मितीसाठी सर्व परवाने एक खिडकी योजनेतून देणाऱ्या पोर्टलचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. येत्या 1 सप्टेंबर 2025 पासून ते पोर्टल कार्यरत होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आतापर्यंतच्या गोव्यातील कोकणी, मराठी चित्रपटांचे संवर्धन करण्याचे निर्देश त्यांनी गोवा मनोरंजन सोसायटीला दिले. तसेच ‘ए’ गटातील चित्रपटासाठी रु. 50 लाख, ‘बी’ गटातील चित्रपटांसाठी रु. 30 लाख तर ‘सी’ गटातील चित्रपटांकरिता रु. 10 लाख अनुदान देणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. नामवंत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना डॉ. सावंत यांच्याहस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पणजीच्या कला अकादमीत हा समारोप सोहळा झाला. डॉ. सावंत यांनी सांगितले की, यावेळचा चित्रपट महोत्सव थोडा वेगळा होता. त्यात कलाकारांसाठी अनेक व्यासपीठे देण्यात आली होती. त्याचा लाभ त्यांना झाला. गोव्यातील कलाकरांनी, निर्मात्यांनी पोर्टलचा फायदा घेऊन चित्रपट क्षेत्रात चमक दाखवावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
जगात दोन कोटी गोमंतकीय
गोव्यात 15 लाख गोमंतकीय असले तरी देशभरात, परदेशात मिळून सुमारे 2 कोटी गोमंतकीय आहेत. त्यांच्यासमोर कोकणी चित्रपट गेला पाहिजे आणि तो जाणार या भावनेतून चित्रपट तयार करा म्हणजे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
कोंकणी चित्रपट पहा : वर्षा
समस्त गोमंतकीय जनतेच्या आशीर्वादाने आपण चित्रपट सृष्टीत आतापर्यंत प्रवास केला आणि तो चालूच आहे. ‘विद्या विनयेन शोभते’ यानुसार आपण जीवन गौरव पुरस्काराचा स्वीकार करते व त्याबद्दल खूश झाली आहे. आपल्या मातृभाषेतून म्हणजे कोकणीतून रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद वेगळाच असतो म्हणून कोकणी सिनेमा तयार करा आणि तो चित्रपटगृहात जाऊन बघा.
किमान 50 लाख द्यावेत
चित्रपट निर्मितीसाठी खूप खर्च येतो म्हणून सरकारने किमान रु. 50 लाख तरी द्यावेत, अशी विनवणी उसगांवकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली. भाषेच्या प्रेमापोटी आपण कोकणी तियात्र, सिनेमातही काम केल्याचे त्यांनी पुढे सांगितले. गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या दहा, अकरा आणि बाराव्या आवृत्तीचा समारोप एकत्र पद्धतीने करण्यात आला. त्यावेळी गोवा मनोरंजन सोसायटी उपाध्यक्ष डिलायला लोबो, माहिती प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर तसेच सोसायटीचे सीईओ अश्विन चंद्रू, परीक्षक समितीचे अध्यक्ष असीम सिन्हा व गजेंद्र अहिरे यांच्याहस्ते महोत्सवातील विविध पुरस्कार देण्यात आले. काही पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. सावंत व भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिले. तिन्ही आवृत्तीचे मिळून सुमारे 100 जणांना पुरस्कार देण्यात आले. समारोप सोहळ्यात विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.









