अध्याय तेविसावा
परम शांतीचे महत्त्व भगवंतांनी उद्धवाला सांगितले. पण उद्धवाला अशी शांती राखणे फारच अवघड आणि अशक्मय वाटत होते. त्यातली अपूर्वाई जाणून तो देवांना म्हणाला, ‘देवा, एकूणच ही सहिष्णुता मिळवणं फार अवघड! तेव्हा ही शांती मला कशी मिळवता येईल ते कृपा करून सांगा. असं म्हणून सर्वशक्तिमान अशा भगवंतांचे पाय उध्दवाने धरले. उद्धवाची विनंती ऐकून भगवंतांना परम संतोष झाला. ते आता शांती आणि निवृत्ती याविषयी सांगणार आहेत. या तेविसाव्या अध्यायामध्ये दुर्जनांनी मनाला कितीही चिरडीला आणण्याचा प्रयत्न केला तरी मन क्षमाशील कसे राहू शकते, याचे निरूपण भगवंत करणार आहेत. धीरगंभीर आवाजात भगवंत उद्धवाला सांगू लागले. म्हणाले, बृहस्पतिशिष्या! दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घरे पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरूष या जगात सहसा सापडत नाही. उद्धवा! तू जे बोललास ते मीही खरेच समजतो. दुर्जनांनी अपमान केला असता तो सहन करण्याइतकी शांती कोणालाच
नसते.
देवही ज्याच्या पादुका मस्तकावर वाहतात, मुख्य इंद्रही ज्याच्या पायी लागतो, अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी होऊन राहिल्या आहेत आणि ब्रह्मज्ञान ज्याच्या अंकित होऊन राहिले आहे त्या देवांचा गुरु बृहस्पतीचा, तू शिष्य म्हणजे साक्षात विवेकाची मूर्तीच आहेस. म्हणून शांती साध्य होण्याचे जे उपाय आहेत ते सांगण्याला तूच योग्य आहेच कारण तुलाच ते समजतील. उद्धवाला शांतीचे रहस्य कळावे म्हणून श्रीकृष्णांनी आदराने त्याचा मोठा गौरव केला आणि कोणत्याही परिस्थितीत शांती बाळगणे केवळ अशक्मय आहे या उद्धवाच्या बोलण्याला अनुमोदन देऊन श्रीकृष्ण शुद्ध शांतीचे स्वरूप सांगू लागले. निंदा, अवज्ञा, उपहास इत्यादि मार्गानी दुर्जनांनी केलेला अपमान जो सहन करेल, तो साक्षात् ईश्वरच होय. तो आत्मज्ञानाने पूर्ण मद्रूपच झालेला असतो.
प्राणिमात्राच्या ठिकाणी आत्मस्वरूप पाहणे हे ज्याला खरोखर पूर्णपणे पटले आहे, तो दुर्जनाच्या आघातालाही मोठय़ा आनंदाने सहन करतो. जो स्वतःच सारे जग बनून राहतो, त्याला कितीही उपद्रव लागले तरी क्रोधाची उसळी येतच नाही. तो मुळीच उद्विग्न न होता ते उपद्रव आनंदाने सहन करितो. आपलाच हात आपल्या अंगाला लागला तर रागाचा किंवा द्वेषाचा शब्द आपल्या तोंडातून निघत नाही, त्याप्रमाणेच चराचराला जो आत्मस्वरूपानेच पाहतो, त्याच्या घरात शांती ही आपण होऊनच शिरते. उद्धवा! असे ज्याला आत्मज्ञान झाले असेल, त्यालाच खराखरा साधु म्हणावा. तोच दुसऱयाचा अपराध सहन करतो. तोच एक शांतीच्या योगाने पवित्र झालेला असतो.
हे आत्मज्ञान ज्यांना समजत नाही, असे जे दुसरे ज्ञानसंपन्न विद्वान् असतात, ते ही द्वंद्वे सहन करू शकत नाहीत. माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणांनी होते, तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही. पोलादाचे अत्यंत तीक्ष्ण बाण असतात, त्यांच्या ज्या घावाने प्राण अगदी विव्हळ होतात त्यांहून दुर्जनांचे वाग्बाण शरीरांत खोल जाऊन रुतून बसतात. लोखंडाचे बाण शरीरावर जेथे लागतात तेवढय़ाच अवयवाने जखमी मनुष्य विव्हळ होतो. पण वाग्बाणांचे सामर्थ्य त्याहून अधिक आहे. त्यांच्या प्रहाराने पूर्वजही जखमी होतात.
लोखंडाच्या बाणाची जखम झाली तर ती जखम झाडपाला लावल्याने बरी होते, पण वाग्बाण एकदा रुतून बसले की त्यांचे शल्य जन्मभर टोचत राहते. वर्में बाहेर काढण्याच्या विषारी भावनेने माखलेले निंदेचे वाग्बाण शरीरात घुसले व त्यांनी अंतःकरणाचा भेद केला की, सर्व अंगभर आगीचा भडका उठतो. अशी दुर्जनाची दुरुक्ति व अपमानाचा उद्धटपणा सोसण्याला लागणारी शांती सामान्य जनांच्या ठिकाणी मुळीच असत नाही.
अशा रीतीने उद्धवाचे मनोगत यथायोग्य ध्यानात घेऊन श्रीकृष्णनाथ शांतीचा निर्णय सांगत आहेत.
क्रमशः









