दुसऱ्या दिवशीही खोदाई सुरू असल्याने वाहतूक कोंडी
बेळगाव : काँग्रेस रोडवर ड्रेनेज वाहिनी घालण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. केवळ एकाच बाजुने वाहतूक सुरू असल्याने वाहनांची प्रचंड कोंडी झाली. विशेषत: दुसरे रेल्वेगेट रेल्वे येण्यासाठी बंद झाल्यानंतर याठिकाणी गर्दीत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना बराच वेळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काँग्रेस रोडवर तिसरे रेल्वे गेटनजीक ड्रेनेज वाहिनी घालण्यात येत आहे. रेल्वे रुळापासून राणी चन्नम्मानगर कॉर्नरपर्यंत रस्त्याच्या एका बाजुने दुसऱ्या बाजूला ड्रेनेज वाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. मंगळवारपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी एका बाजूने रस्ता बंद करून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. बुधवारीही अशाच प्रकारे रस्ता बंद करून काम सुरू होते. रेल्वे आल्यानंतर टिळकवाडी येथील दुसरा रेल्वेगेट बंद करावा लागतो. त्यानंतर एकाचवेळी वाहने आल्यामुळे बुधवारी अनेकवेळा वाहतूक कोंडी होत होती. यामुळे काँग्रेस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ड्रेनेज वाहिनी घालण्याचे काम सुरू होते. क्रेनच्या साहाय्याने ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू असल्याने एका बाजूची वाहतूक बंद ठेवली होती.









