वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेने आपली एक व्हिसा सुविधा बंद केली आहे, अशी माहिती या देशाच्या दूतावासाने भारतीयांसाठी प्रसिद्ध केली आहे. ही सुविधा ‘थर्ड पार्टी पासपोर्ट कलेक्शन’ या नावाने ओळखण्यात येत होती. या व्यवस्थेअंतर्गत ज्याने व्हिसासाठी आवेदनपत्र सादर केले आहे, त्याने अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला व्हिसाचे शिक्के असणारा पासपोर्ट स्वीकारण्याची मुभा देण्यात आली होती. आता ही सवलत 1 ऑगस्टपासूनच रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापुढे ज्याने व्हिसासाठी आवेदन केले असेल, त्यालाच व्यक्तीश: व्हिसाचे शिक्के असलेला पासपोर्ट देण्यात येणार आहे. तसेच ज्यांचे वय 18 वर्षांच्या खाली आहे, त्यांच्या पालकांना किंवा मातापित्यांना व्यक्तीश: उपस्थित राहून पासपोर्ट स्वीकारावा लागणार आहे. पासपोर्ट धारकांच्या आणि व्हिसा धारकांच्या कागदपत्रांच्या सुरक्षेकरिता हा नियम करण्यात आल्याचे अमेरिकेच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे. जर पालक पासपोर्ट स्वीकारणार असेल, त्याच्याकडे मूळ मातापित्यांचे ओरिजनल अनुमतीपत्र असणे आवश्यक आहे. अनुमतीपत्राच्या झेरॉक्स प्रती, प्रमाणित प्रती किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रती चालणार नाहीत, असे अमेरिकेच्या दूतावासाकडून, अमेरिकेचा व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या भारतीयांना शनिवारी कळविण्यात आले आहे. तसेच या सूचनेची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी, असेही प्रतिपादन अमेरिकेच्या दूतावासाकडून करण्यात आले आहे.









