महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्तरित्या कारवाई
बेळगाव : प्लास्टिकविरोधी मोहीम महापालिका आणि पर्यावरण प्रदूषण मंडळाने तीव्र केली असून प्लास्टिकची विक्री करणाऱ्या कलमठ रोड येथीलदोन दुकानांवर कारवाई करून बुधवार दि. 5 रोजी तब्बल एक टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असतानाही अद्यापही व्यापाऱ्यांकडून प्लास्टिकची विक्री केली जात आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होण्यासह मानवी जीवनावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे.
त्यामुळे सिंगल युज प्लास्टिकची विक्री आणि वापर करण्यात येऊ नये, यासाठी दंडात्मक कारवाई करण्यासह जनजागृती केली जात आहे. अलीकडेच महिनाभरापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाजारपेठेतील प्लास्टिक विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी हॉटेलमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यावर निर्बंध घातले आहेत. असे असतानाही कलमठ रोडवरील दोघा दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर बुधवारी महापालिकेचे पर्यावरण अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या या दोन्ही दुकानांवर छापा टाकला. छाप्यादरम्यान एक टन प्लास्टिक जप्त केले असून दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बेकायदा प्लास्टिकचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









