आंदोलकात संताप, महिलांची कुचंबणा
बेळगाव : एकीकडे हिवाळी अधिवेशनासाठी लाखो रुपये उधळले जात असताना दुसरीकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आलेल्या आंदोलकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक दिवशी हजारो आंदोलक आंदोलनस्थळी दाखल होत असताना त्यांच्या सुविधेसाठी केवळ एकच मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे महिलावर्गाची तर मोठी कुचंबणा होत असल्याने प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.अधिवेशनाच्या काळात राज्यातील अनेक संघटना आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी आंदोलन करीत असतात. यावर्षी आंदोलकांना दोन ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हलगा गावानजीक सुवर्ण गार्डन परिसर व कोंडुसकोप येथील माळावर आंदोलनासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. सुवर्ण गार्डन येथे लहानमोठे पंधराहून अधिक मंडप आहेत. दररोज सात ते आठ हजार नागरिक आंदोलनासाठी या मंडपांमध्ये दाखल होत आहेत.
गुरुवारी व शुक्रवारी तर पुरुषांपेक्षा महिला आंदोलकांची संख्या मोठी होती. सात ते आठ हजार आंदोलक असतानाही केवळ एक मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना बाजूच्या शेतवडीत नैसर्गिक विधीसाठी जावे लागत आहे. परंतु, त्या ठिकाणी शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी शेतामध्ये येण्यास मज्जाव करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर शेताला पाणी देऊन जमीन ओली केली आहे. त्यामुळे शेतात शिरणेही कठीण आहे.मोबाईल टॉयलेटची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना जागा मिळेल त्या ठिकाणी नैसर्गिक विधी करावे लागत आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेले मोबाईल टॉयलेटही अतिशय गैरसोयीचे आहे. दुर्गंधीमुळे परिसरात थांबणेही अवघड झाले असल्याने आंदोलकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हीच परिस्थिती कोंडुसकोप येथील आंदोलनस्थळावर देखील आहे. या ठिकाणी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही एकाच मोबाईल टॉयलेटचा वापर करावा लागत असल्याने मोबाईल टॉयलेटची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.









