2100 क्युसेस विसर्ग सुरू, सांगलीत चार दिवसाने पाणी पोहोचणार
सांगली प्रतिनिधी
कृष्णा नदी कोरडी पडल्याने साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आदेशाने शुक्रवारी कोयनेतून सांगलीला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. कोयना धरणातून 2100 क्युसेसने विसर्ग सुरू केला असून तीन ते चार दिवसांत हे पाणी सांगलीला मिळणार आहे. पाण्यासाठी सांगली जिल्हयातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने आ. अनिल बाबर यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. आ.बाबर यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडेही पाठपुरावा केला. तर कोयनेतून पाणी सोडण्याच्या वर्षभराच्या नियोजनासाठी 29 ऑक्टोबर रोजी सांगलीत होणाऱ्या कालवा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय होईल. त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सांगली जिल्हयाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. कोयनेतून पाणी सोडण्यासाठी सातारा पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने पाटबंधारे विभागाने मागणी करूनही सांगलीला पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने 70 गावांच्या पिण्याच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. शुक्रवारी याचा उद्रेक सांगलीत झाला. कोयना धरणात 89.7 टीएमसी पाणीसाठा असला तरी प्रत्यक्षात ा†जवंत पाणीसाठा 83.94 टीएमसी इतका आहे. अखेर शुक्रवारी कोयनेतून एक टीएमसी पाणी सांगलीसाठी सोडण्याचा निर्णय झाला असून 2100 क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तर आपणही हस्तक्षेप करणार, कालवा समितीची रविवारी बैठक : खाडे
कालवा समितीची रविवारी सांगलीत बैठक होत आहे. यामध्ये जादा सात टीएमसी पाण्याची मागणी करण्यात येणार आहे. पाण्याच्या नियोजनात सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हस्तक्षेप करत असतील तर आपणही हस्तक्षेप करणार असल्याचा इशारा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला. मंत्री देसाईची ही बाब उपमुख्यमंत्री फडणीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संभाव्य संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढा : आ. बाबर
पाण्यावरून सातारा आा†ण सांगली असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी आ. अनिल बाबर यांनी केली आहे. संभाव्य संघर्षावर चर्चेतून तोडगा काढून जनतेला ा†दलासा देणे महत्त्वाचे असल्याचेही आ. बाबर यांनी म्हटले आहे.
वीज निर्मीतीचे पाणी कपात करा, वीज खासगी कंपन्याकडून घ्या : आ. लाड
वीज निर्मीतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी. साखर कारखाने आणि खासगी उद्योगाकडून स्वस्तात वीज खरेदी करावी. परंतु शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी योग्य नियोजन करावे. केवळ चर्चा आणि बैठकांचा फार्स नको अशी मागणी आ. अरूण लाड यांनी केली आहे. सांगली शहरास कृष्णाकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये कोयना धरणातील पाणी सोडण्याची मागणी केली होती. दहा दिवसांत याबाबत कारवाई झाली नाही. पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याची मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.








