ग्रामपंचायतचा उपक्रम ः काजू, आंबा, फणस, जांभुळ आदी रोपटय़ांचा समावेश
वार्ताहर/ किणये
बिजगर्णी ग्रामपंचायतीच्यावतीने एक हजार रोपटय़ांची लागवड करण्यात येणार आहे. या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. रोजगार हमी योजनेंतर्गत खड्डे काढण्यात आले असून गावातील गायरान जमिनीतही रोपटय़ांची लागवड करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी दिली.
अधिकारी शशिकला घारशंगी, पीडीओ हर्षवर्धन अगसर आदींच्या हस्ते रोपटी लागवड कामाचा शुभारंभ करण्यात आला. काजू, आंबा, फणस, जांभुळ आदी रोपटय़ांचा यामध्ये समावेश आहे. पर्यावरणाबाबत जागृती निर्माण व्हावी, पर्यावरणाचा समतोल राखला जावा, तसेच गावातील गरजूंना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे.
यावेळी संतोष कांबळे, बबली नावगेकर, चंद्रभागा जाधव, पुंडलिक जाधव, मल्लाप्पा भाष्कळ, बळीराम भाष्कळ, ग्रा. पं. सचिव अनिल पाटील, क्लार्क जितेंद्र कागणकर आदी उपस्थित होते.









