मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करमळीत दाखवला बावटा
पणजी : गोव्यातील भाविकांना उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे महाकुंभ तीर्थस्नानासाठी पाठविण्याच्या उद्देशाने सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या मोफत रेल्वे सेवेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुऊवारी उद्घाटन केले. या विशेष रेल्वेला करमळी रेल्वे स्थानकावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बावटा दाखवून रवाना करण्यात आले. ‘मुख्यमंत्री देव दर्शन’ योजनेंतर्गत भाविकांसाठी या विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्याची कोणतीही समस्या नसलेले 18 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिक या सेवेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
गोवा सरकारने यात्रेकरूंसाठी राज्यातून प्रयागराजपर्यंत तीन विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी करमळी येथे पहिली ट्रेन सुरू केली. त्याद्वारे गोव्यातून सुमारे 1,000 भाविक रवाना झाले. पुढील 34 तासांच्या प्रवासानंतर ते प्रयागराजला पोहोचणार आहेत. कार्यक्रमास समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या योजनेंतर्गत तीन गाड्या प्रयागराजसाठी जाणार असून उर्वरित दोन गाड्या दि. 13 व 21 फेब्रुवारी रोजी रवाना होतील, असे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी,प्रयागराजला जाणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढल्यास सरकार आणखी मोफत गाड्या सोडण्याचा विचार करू शकते, असे सांगितले. अशाप्रकारे हा ऐतिहासिक महाकुंभ मेळा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले. सावंत यांनी स्पष्ट केले की, गोवा सरकारने प्रयागराजला भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांना रेल्वे प्रवासादरम्यान जेवणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांच्या प्रत्येक गटाला महाकुंभमध्ये 24 तास घालवावे लागतील, त्यानंतर ते प्रयागराजहून परतीच्या गाड्यांमधून गोव्याला परततील, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ प्रारंभ झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.









