मडगाव : रूमडामळ-दवर्ली पंचायत क्षेत्रातील कथित बेकायेदशीर मदरसावर सातत्याने आवाज उठविणारे रूमडामळचे माजी सरपंच व विद्यमान पंच विनायक वळवईकर यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलीसांनी आयुब खान या संशयिताला अटक केली आहे. या हल्ल्यामागे ऊमडामळ येथील कथित बेकायदेशीर मदरसा प्रकरणाशी संबंध लावला जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे रूमडामळ परिसरात तणावग्रस्त स्थिती असून काल स्वामी समर्थगड येथे विश्व हिंदू संघटना व बजरंग दल व स्थानिकांची बैठक झाली. या बैठकीनंतर रूमडामळ परिसरात रॅली काढण्यात आली. ‘जय श्री राम’, ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या. या रॅलीत सुमारे 350 लोकांचा सहभाग होता. त्यानंतर ही रॅली रूमडामळ येथील पोलीस आऊट पोस्टवर गेली. यावेळी सासष्टीचे मामलेदार ही उपस्थित होते. रूमडामळ परिसरातील कथित बेकायदेशीर मदरतसा त्वरित बंद करावी तसेच सर्व ‘बिफ’ची दुकाने बंद करावी आणि रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केलेली सर्व दुकाने हटवावी अशी मागणी करण्यात आली. काल उशिरा पर्यंत या भागात तणावग्रस्त स्थिती होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपअधीक्षक संतोष देसाई, मडगावचे निरीक्षक तुळशीदास नाईक, कुंकळळीचे निरीक्षक चव्हाण, मायणा-कुडतरीचे निरीक्षक रवी देसाई उपस्थित होते.
गाडीची काच फोडून चाकूने वार
शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पंच सदस्य विनायक वळवईकर हे स्थानिक आमदार उल्हास तुयेकर यांना भेटून आपल्या गाडीतून जात असताना मोबाईल कॉल घेण्यासाठी रस्त्यात थांबले असता एका व्यक्तीने जड वस्तूने त्यांच्या गाडीची काच फोडून नंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वळवईकर यांनी प्रसंगावधान राखून गाडीचे दार उघडून त्या मारेकऱ्याला ढकलून दिल्याने हा मारेकरी पळून गेला, अशी माहिती वळवईकर यांनी दिली. या पंचायतीचे अन्य एक पंच समीउल्ला फणीबंध यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून गाडीची मोडतोड करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे .
दोषींवर गंभीर कारवाई करणार : मुख्यमंत्री
पंचावर झालेली ही हल्ल्याची घटना गंभीर आहे. या प्रकरणाचा मी अहवाल घेतला आहे. त्यावर गंभीर करवाई केली जाईल. आपण या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोहिया मैदानावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बेकायदेशीर मदरशावऊन तणाव
हाऊसिंग बोर्ड परिसरात गेल्या चार वर्षांपासुन एका घरात बेकायदेशीरपणे सुऊ असलेल्या मदरशावऊन परिसरात वातावरण तापले आहे. पंच विनायक वळवईकर यांनी हे प्रकरण ग्रामसभेत उपस्थित केल्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाचीही झाली होती. वळवईकर यांनी बेकायदेशीर मदरशा प्रकरणी कुडतरी पोलिसातही तक्रार दखल केली होती. त्यामुळे वळवईकर यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे.
हा पूर्वनियोजित कट
आपल्यावर हल्ला करण्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पंच विनायक वळवईकर यांनी यांनी व्यक्त केला आहे. कारचा ग्लास फोडून चाकूने आपल्या गळ्यावर व छातीवर वार करण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. जर आपण वेळीच कारचा दरवाजा उघडून हल्लेखोराला ढकूलन दिले नसते तर त्याने आपला प्राण घेतला असता असे वळवईकर म्हणाले.









