जिल्हा रुग्णालयातील प्रकार : प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
बेळगाव : एकाच प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महापालिकेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळे दर आकारण्यात आल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. एका कर्मचाऱ्याला सामान्य तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली असून अनुसूचित जाती-जमातीच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे बिम्सचे डॉ. सतीश नेसरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सफाई कर्मचारी कावलू समिती कर्नाटक यांच्यावतीने समाज कल्याण खात्याला देण्यात आले आहे. किशोर ठकाप्पा लाखे (वय 36, रा. ज्योतीनगर, गणेशपूर) आणि रेवणसिद्धाप्पा गब्बूर (वय 40) अशी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सफाई कामगारांची नावे आहेत.
किशोर आणि रेवण सिद्धाप्पा यांना एकाच प्रकारचा आजार जडला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किशोर याच्यावर शस्त्रक्रिया करून सिरॅमिक एम्प्लांट बसविण्यात आला. यासाठी 40 हजार रुपये बिल आकारण्यात आले. त्याचबरोबर त्याच्यावर सामान्य वॉर्डात उपचार करण्यात आले. याच प्रकारची शस्त्रक्रिया रेवणसिद्धाप्पा याच्यावरही करण्यात आली. मात्र त्यासाठी 95 हजार रुपये बिल करण्यासह व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. सतीश नेसरी यांनी केली असून एक प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी दोन वेगवेगळे दर आकारण्यात आल्याने बिम्स प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. एकंदरीत अनुसूचित जाती-जमातीच्या वैद्यकीय निधीचा दुरुपयोग झाला असून हा प्रकार करणाऱ्या डॉ. सतीश नेसरी यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









