लग्नसराईला आता लवकरच प्रारंभ होणार आहे. अलिकडच्या काळात सोशल मिडियाचे प्रस्थ प्रचंड वाढल्याने या माध्यमाचा उपयोगही विवाहाच्या संदर्भात करुन घेतला जातो. विवाहासाठीच्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या जातात. वधुवरांचा शोध घेऊन लग्ने जुळविण्यासाठी तर हे माध्यम अत्यंत सोयीचे झाले आहे. अनेक ऑनलाईन विवाह जुळणी संस्था किंवा कंपन्या स्थापन झाल्या आहेत. विवाहासंबंधीच्या वेबसाईट्स तर मोजता येणार नाहीत, इतक्या आहेत.
अनेक लोक विवासासाठी स्थळे शोधताना विविध प्रकारच्या अनोख्या अन् काहीवेळा अजब जाहिराती सोशल मिडियावर टाकतात. सध्या अशी एक जाहिरात भलतीच लोकप्रिय झाली आहे. ती एका विवाहेच्छू तरुणीने प्रसारित केलेली आहे. या तरुणीला केवळ पती नको आहे, तर तो तिचा रील पार्टनर असावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलेला आहे.
रिया नामक तरुणीने केलेली ही जाहिरात आहे. ती एक मिडिया एन्फ्ल्यूएन्सर आहे. याचा अर्थ असा की ती स्वत:चे व्हिडीओज सोशल मिडियावर टाकून लोकप्रिय झालेली आहे. त्यामुळे तिला तिचा पतीही तशाच प्रकारचा हवा आहे. विवाहानंतर पतीने तिचा रील पार्टनर व्हावे, म्हणजेच अशा व्हिडीओजमध्ये तिच्यासह भाग घ्यावा अशी तिची इच्छा आहे. आपला भावी पती कॅमेऱ्यासमोर लाजणारा असता कामा नये. तो आपल्यासह रिलेशनशिप रील्स बनविण्यास तयार असला पाहिजे. रील्स कसे तयार केले जातात, ट्रेंडिंग म्युझिक सध्या कशा प्रकारचे आहेत, लोकांना कशा प्रकारचे रील्स आवडतात, याची त्याला चांगली जाण असावयास हवी. तो एकत्र कुटुंबातील नसावा. कारण एकत्र कुटुंबात घरातील ज्येष्ठ सदस्य अशा रील्सना विरोध करण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय, तर तिला तिच्यासारखाच प्रसिद्धीप्रिय तरुण पती म्हणून हवा आहे.
त्याला प्रिमियर प्रोचे ज्ञान असावयास हवे. तो माझे व्हिडीओज एडिट करु शकला पाहिजे, अशाही तिच्या मागण्या आहेत. तिने या मागण्या सोशल मिडियावर पोस्ट केल्या असून एक व्हिडीओही टाकला आहे. इच्छुक वराने हा व्हिडीओ एडिट करुन दाखवावा. मग त्याचा विचार केला जाईल, असेही तिचे म्हणणे आहे. तेव्हा या क्षेत्रातील इच्छुकांना ही एक चांगली संधी आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या विवाह जाहिरातीवर सोशल मिडीयात व्यक्त होत आहेत.









