वृत्तसंस्था / झुरीच
2025 च्या युरो चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या ड गटातील सामन्यात फ्रान्सने वेल्सचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला तर दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्सचे आव्हान 4-0 असे संपुष्टात आणले.
ड गटातील झालेल्या सामन्यातील विजयानंतर फ्रान्सने या गटात 6 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. या गटात इंग्लंड आणि हॉलंड यांनी प्रत्येकी 3 गुण मिळविली आहेत. आता रविवारी या गटामध्ये वेल्सचा शेवटचा सामना इंग्लंड बरोबर होणार आहे. वेल्स संघाला या स्पर्धेत अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्याचप्रमाणे फ्रान्स आणि नेदरलँड्स यांच्यात ड गटातील शेवटचा सामना होणार आहे.
फ्रान्स आणि वेल्स यांच्यातील झालेल्या सामन्यात सुरुवातीपासूनच फ्रान्सने आक्रमक आणि वेगवान खेळ केल्याने वेल्सला फ्रान्सच्या गोलपोस्टपर्यंत वारंवार हल्ले करता आले नाहीत. फ्रान्सचे खाते क्लेराने 8 व्या मिनिटाला उघडले. 14 व्या मिनिटाला 38 वर्षीय सेरी हॉलंडने वेल्सचा एकमेव गोल करुन आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. खेळाच्या उत्तराधार्थ फ्रान्सतर्फे अॅमेल मेजरीने तसेच ग्रेसी गियारो यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यात इंग्लंडतर्फे लॉरेन जेम्सने दोन गोल तर जॉर्जिया स्टेन वे आणि टिला टोनीने प्रत्येकी 1 गोल केला. इंग्लंडचा महिला संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. या स्पर्धेत चार दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात फ्रान्सकडून इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता.









