अध्याय एकोणतिसावा
भगवंतांनी उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि सांगितले की, तू आता हे ज्ञान पात्र शिष्यांना दे. तसेच हे ब्रह्मज्ञान कुणाकुणाला देऊ नये हेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जे सद्गुरूंपाशी स्वत: किती महान आहोत हे सांगून त्याचा गवगवा करतात त्यांना गर्व झालेला असतो. गुरुंनी सांगितलेली कामे करणे हीच गुरुभक्ती आहे हे मान्य नसल्याने त्यांना गुरुसेवेचे काहीच महत्त्व वाटत नाही. हलकीसलकी कामे टाळण्यासाठी ते म्हणतात, तुम्ही मागाल ते धन आम्ही तुम्हाला देऊ अशा व्यक्तींना हे ज्ञान देऊ नये. धनाची अपेक्षा करून जो गुरु शिष्यांना उपदेश करेल त्याचे ब्रह्मज्ञान नष्ट होऊन त्याला धनाचा लोभ जडेल. सद्गुरु म्हणजेच ब्रह्ममूर्ती असे ज्यांना मनापासून वाटत नाही त्यांनाही हाती धरू नये. निर्गुण ब्रह्माचे सद्गुरू हे सगुण रूप असतात परंतु गुरु हे ब्रह्माहून वेगळे आहेत असे म्हणणारे अभक्त असल्याने त्यांना शिष्य करू नये. मी सांगितलेले ब्रह्मज्ञान ज्याला मान्य नसते त्याची परब्रह्ममूर्ती असलेल्या माझ्यावर भक्ती नसल्याने त्याला शिष्य करू नये. संतसज्जन ह्या माझ्याच मूर्ती आहेत, माझे भक्त माझे प्राण आहेत, अशांची जो अवहेलना करतो त्याला ‘दुर्विनीतपण’ असे म्हणतात. जो साधुसज्जनांना खोट्या नम्रतेने नमस्कार करतो, त्यांचे गुणदोष पाहतो त्याच्यात ‘दुर्विनीतता’ असते. भगवंतांनी दुर्वर्तनी शिष्यांबद्दल सांगितल्यावर, ते सर्व ऐकून उद्धवाने असे मत व्यक्त केले की, ह्यापेक्षा शिष्य न करणे हेच हिताचे आहे असे मला वाटू लागले आहे. त्यावर भगवंत म्हणाले, अरे असे करू नकोस. सच्छिष्य कुणाला म्हणावे हेही तुला सांगतो. त्या व्याख्येत बसणाऱ्याला तू ब्रह्मज्ञानाचा उपदेश करू शकतोस कारण तो जणू माझा आत्माच असतो. ज्याचं धगधगतं वैराग्य असतं तोच ब्रह्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करण्याचा अधिकारी असतो. अर्थातच धगधगतं वैराग्य म्हणजे पिशाचवैराग्य नव्हे तर विवेकसंपन्न शास्त्राsक्त वैराग्य होय. चार दिवस वैराग्य करणे आणि मग पुन्हा विषयसेवन सुरु करणे हा ज्यांचा परिपाठ असतो त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे म्हणजे सापाला दुध पाजण्यासारखे आहे. ज्याचे वैराग्य निघून जाते त्याच्या ठिकाणी फक्त ज्ञानाभिमान उरतो. ह्या अभिमानातून तो करतो काय तर, श्रेष्ठ मंडळींची निंदा करून त्यांचे गुणदोष पहातो. उद्धवा जगात माणसांच्या दोन अवस्था असतात.
वैराग्य किंवा विषयासक्तता. ह्याव्यतिरिक्त तिसरी अवस्था नसते. ज्या साधकाचा विवेक क्षीण असतो, तो चांगले काय, वाईट काय ह्याबद्दल फारसा विचार करत नसल्याने, तो सद्गुरूंच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करत असतो. त्यामुळे त्याचे वैराग्य प्रखर असते पण ज्याची विवेकशक्ती प्रभावी असते त्याला चांगले काय, वाईट काय हे नीट कळत असले तरी ज्ञानाभीमानाने विषयाचरणाचा विजय होतो. थोडक्यात फारसा विचार न करता जो प्रखर वैराग्य पाळायचे आहे असे ठरवतो, त्याचे वैराग्य मी म्हणतोय तसे धगधगते असते.
असा साधक सद्गुरुना अनन्यशरण गेला की, तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याच्या दृष्टीने ‘अधिकारीरत्न’ झाला असे म्हणता येईल. मागे मी तुला दोषांबद्दल सविस्तर सांगितले आहे. ते ज्याच्यात नसतील, त्याचे वैराग्य प्रखर असल्याने तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला पात्र आहे असे समज. जो ब्राह्मणभक्ती करतो आणि अन्य लोकांना वंदन करतो त्याला भक्ती आणि विरक्ती आंदण दिल्यासारखीच असते. एखादा शिष्य सद्गुरूंचा आवडता असतो पण अभक्त असल्याने त्याचा माझ्यावर विश्वास नसतो म्हणून तोही ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. त्याला सद्गुरुंनी प्रथम माझ्या चरणी अनन्य करावे, त्याचे अभक्तपण घालवून त्याला वैराग्यपूर्ण करावे आणि मग त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा.








