पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील सुमारे 900 एकपडदा चित्रपटगृहे बंद अवस्थेत आहेत. मात्र ही चित्रपटगृहे बंद न करण्याच्या राज्य सरकारच्या नियमाचा फटका त्यांना बसत असून, ही चित्रपटगृहे बंद करण्यास तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
चित्रपटगृहे बंद असली, तरी करमणूक कर, वीज बिले, प्रॉपर्टी टॅक्स तसेच कामगारांचे पगार, देखभालीवर चित्रपटगृह मालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेत उत्पन्न काहीच नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी एकपडदा चित्रपटगृह मालकांच्या संघटनेसह बैठक आयोजित करून या जाचक अटी शिथिल कराव्यात. तसेच त्याजागी चित्रपटगृहासह इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी’, अशी मागणी यात करण्यात आली आहे.








