सहा दुचाकी जप्त, टिळकवाडी पोलिसांची कारवाई
बेळगाव : टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकाला अटक करून 2 लाख रुपये किमतीच्या चोरीला गेलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. अडवेश लक्ष्मण निपाणी (वय 20, रा. लगमेश्वर, ता. गोकाक, सध्या रा. भाग्यनगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत दुचाकी चोरीप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून सदर तपास हाती घेण्यात आला होता. संशयास्पदरित्या आढळलेल्या अडवेशची चौकशी केल्यानंतर चोरी प्रकरणाचा उलगडा झाला आहे. सदर चोरट्याने उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत 2, ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत 2 व टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2 अशा सहा दुचाकी चोरल्या होत्या. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी, उपनिरीक्षक संतोष दळवाई, पोलीस कर्मचारी महेश पाटील, लाडजीसाब मुलतानी, नवीनकुमार गुज्जण्णावर यांनी या कारवाईत भाग घेतला होता.









