चौघेजण गंभीर जखमी : खानापूर-गुंजी रस्त्यावरील नायकोल क्रॉसजवळ दुर्घटना
वार्ताहर /गुंजी
रविवारी पहाटे गुंजीजवळ थांबलेल्या ट्रकवर आयशर ट्रक धडकल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर-गुंजी रस्त्यावरील नायकोल क्रॉसजवळ घडली. याबाबत माहिती अशी की, संगरगाळी येथील आयशर वाहन गुंजीहून खानापूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी रस्त्यावर नादुऊस्त होऊन थांबलेल्या अवजड वाहनाला आयशरची पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नारायण लक्ष्मण कडोलकर (वय 65) हे ठार झाले. तर वैभवी विठ्ठल मनोळकर (वय 41), इझित फिलीप लिमा (वय 45) या दोन महिला व फिलीप बस्त्याव लिमा (वय 60) हे गंभीर जखमी झाले तर विठ्ठल शांताराम मनोळकर हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात इतका भयानक होता की, आयशरच्या समोरचा पूर्ण चेंदामेंदा झाला. त्यामुळे समोर बसलेल्या नारायण कडोलकर यांचा पाय आसन आणि केबिन यांच्यात तुटून अडकला. तर इतर चौघेजण या वाहनातून आश्चर्यकारक बचावले आहेत.
अपघात होताच वाहनातील सर्वजण मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. मात्र पहाटे चारची वेळ असल्याने अपघातस्थळी बचावासाठी कोणीही आले नाहीत. जखमी अवस्थेतीलच काहींनी 108 ऊग्णवाहिकेला फोन केला. त्यानंतर ऊग्णवाहिका आल्यानंतर मदत कार्य सुरू झाले. त्यानंतर जखमांना खानापूर सरकारी इस्पितळात आणण्यात आले. मात्र नारायण कडोलकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा पाय निकामी झाला होता. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मदतकार्य मिळण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. नारायण कडोलकर हे गरीब असून दररोज रोजंदारीवर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घरातील कर्त्या पुऊषाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण संगरगाळी गावात शोककळा पसरली आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून संगरगाळीमध्ये त्यांचा अंत्यविधी पार पाडला.
बंदी असतानाही अवजड वाहन आले कसे?
वास्तविक, खानापूर-रामनगर या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी आहे. त्यामुळे बंदी असताना अवजड वाहन आले कसे?, या आधीही या रस्त्यावरून अवजड वाहने रात्रीच्या वेळी जात होती. मात्र गुंजी येथे श्रीराम सेनेने आंदोलन करून अवजड वाहनांना रोखून धरले होते. त्यानंतर या मार्गावरून अवजड वाहने पूर्णपणे बंद होती. मात्र सध्या रात्रीच्या वेळी अशी वाहने जात असल्यानेच हा अपघात घडला असून अशा वाहनामुळेच एकाला प्राणाला मुकावे लागले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.









