दुसऱ्या रेल्वेगेटवर रेल्वे थांबून राहिल्याने वाहतुकीची कोंडी
बेळगाव : शुक्रवार सकाळची वेळ… काहींना कामावर तर विद्यार्थ्यांना शाळेला जाण्याची घाई… अशातच एका वृद्धाला पहिल्या रेल्वेगेटवर रेल्वेची धडक बसून त्याचा मृत्यू झाला… ज्या रेल्वेखाली वृद्ध सापडला ती रेल्वे तर निघून गेली… मात्र, या अपघात प्रकरणाचे सोपस्कार पूर्ण होईतोपर्यंत दुसऱ्या रेल्वेचे आगमन झाले. रेल्वेरूळावरील गर्दी पाहून ड्रायव्हरने रेल्वे थांबविण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे थांबविली. मात्र, या अपघाताचा परिणाम दुसऱ्या रेल्वेगेटवर पाहायला मिळाला. थांबविण्यात आलेल्या रेल्वेने दुसरे रेल्वेगेट पूर्णत: व्यापल्याने वाहतूक खोळंबली होती. कामाला निघालेल्या नागरिकांना तर वेळ होतच होता. त्याबरोबरच सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही परीक्षेसाठी वेळेत पोहोचणे आवश्यक होते. परंतु, रेल्वे वेळेत जाग्यावरून हलण्याची लक्षणे काही दिसून येत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रेल्वेगेट ओलांडण्याचा प्रयत्न सुरू केला.
सुटकेचा नि:श्वास सोडला
दुसऱ्या रेल्वेगेटवर थांबलेल्या ट्रेनच्या एका दरवाजातून चढून हे विद्यार्थी पलीकडच्या दरवाजातून रेल्वेरूळावर उड्या मारून उतरू लागले. विद्यार्थ्यांचे हे भलते धाडस पाहून इतर नागरिकांच्याही काळजीत भर पडली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी परीक्षेचे कारण सांगितल्याने नागरिकांचाही नाईलाज झाला. यावेळी विद्यार्थी रेल्वेचा डबा ओलांडत असताना जर रेल्वे सुरू झाली असती तर काय प्रसंग उद्भवला असता याची कल्पनाही करवत नाही. शेवटी स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करून सगळे विद्यार्थी सुखरुपपणे रेल्वेगेट पार करण्यात यशस्वी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.









