40 किलोचे हजारो चीज व्हील्स पडले अंगावर
वृत्तसंस्था/ रोम
इटलीत चीजखाली अडकून पडल्याने 74 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. इटलीच्या लोम्बार्डीमध्ये जियाकोमो कियापारिनी नावाचा व्यक्ती स्वतच्या चीज फॅक्ट्रीत काम करत होता. या फॅक्ट्रीत 40-40 किलोचे चीज व्हील्स धातूच्या रॅकवर ठेवण्यात आले होते. यातील अचानक एक रॅक तुटल्याने चीज व्हील्स खाली कोसळू लागले, काही क्षणातच जियोकोमो हजारो चीज व्हील्सखाली गाडले गेले. बचाव पथकाने चीजच्या ढिगात त्यांचा शोध घेतला. 12 तासांनी त्यांचा मृतदेह हस्तगत झाला आहे.
दुर्घटनेत जीव गमाविणाऱ्या व्यक्तीच्या प्रकल्पात दरवर्षी ग्राना पडानो चीजचे 15 हजार व्हील्स तयार होतात. ग्राना पडानो एक प्रकारचा कठोर चीज असून जो इटलीत अत्यंत लोकप्रिय आहे. फॅक्ट्रीत 33 फुटांच्या उंचीपर्यंत चीज व्हील्स ठेवण्यात आले होते. या दुर्घटनेत सुमारे 7 दशलक्ष युरो म्हणजेच 63 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.









