पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे
यड्राव : पत्नीच्या नादी लागल्याच्या कारणावरुन पतीने आपल्या भावाच्या मदतीने मित्राचाच वरवंट्याने ठेचून खून केला. ही घटना शहापूर येथील गणेशनगरमध्ये शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. विनोद आण्णासो घुगरे (वय 32, रा. गणेशनगर, शहापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी वनिता सचिन बोरगे (रा. गणेशनगर) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. संतोष दशरथ ऊर्फ वसंत पागे ऊर्फ नागणे (वय 38) आणि संजय दशरथ पागे (वय ३६, दोघे रा. गणेशनगर, शहापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
विनोद घुगरे, संतोष पागे व संजय पागे हे तिघेजण एकत्र राहण्यास आहेत. यातील संशयित संतोष पागे याची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहते. परंतु विनोद घुगरे व पत्नीमध्ये काहीतरी असल्याचा संशय संतोष पागे याला होता. यातून १६ ऑगस्ट रोजी रात्री संतोष पागे व विनोद घुगरे यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी संतोष पागे व संजय पागे या दोघा भावांनी दगडी वरवंट्याने विनोद घुगरे याच्या डोक्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने घुगरे याचा जागीच मृत्यू झाला. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यावर घराला बाहेरून कुलूप लावून ते दोघे पसार झाले. याच दरम्यान विनोद याची बहीण वनिता बोरगे ही विनोदला फोन करत होती. परंतु तो उचलत नसल्याने संजय पागे याला तिने फोन लावला.
त्यावेळी संजय पागे याने आम्ही दोघा भावांनी तुझ्या भावाला ठार मारले आहे, असे सांगितले. त्यानुसार बहिणीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु घराला कुलूप असल्याने तिने आपल्या पतीला घेऊन शहापूर पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी धाव घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.








