वाहनचालकांना अंशत: दिलासा, वाहतूक सुरळीत
प्रतिनिधी / पणजी
येथील अटल सेतूवर काम सुरू असल्याने काही दिवसांसाठी अटल सेतू वाहतुकीस बंद करण्यात आला होता. मात्र त्यामुळे पर्वरी, पणजी आणि मेरशी आणि पुढे बांबोळीपर्यत वाहतुकीची कोंडी होऊ लागल्याने अखेर काल गुऊवारी सकाळी 9 वाजल्यापासून अटल सेतूवरील एक लेन सुरू करण्यात आली. त्यामुळे म्हापसाहून येणारी वाहने अटल सेतूवरून थेट मेरशी सर्कलकडून पुढे फोंडा, मडगाव वास्कोच्या दिशेने सुरळीतपणे जाऊ शकली.
अटल सेतूवर दुरुस्तीकाम सुरू असले तरी संपूर्ण अटल सेतू बंद केल्यामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होतात. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार आम्ही पाहत आहोत, त्यामुळे जीएसआयडीसीकडून परवानगी मिळवून एक लेन सुरू करण्यात आली आहे, असे वाहतूक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी सांगितले. दुसऱ्या लेनमध्ये काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर दोन्ही लेन्स सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.









