प्रतिनिधी / वास्को
वरूणापुरी मांगोरहिल येथील नौदल क्षेत्रातील इमारतीचे छत कोसळून नौदलाचा नागरी कर्मचारी जागीच ठार झाला. या घटनेत अन्य दोन नौदल नागरी कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. मयत कर्मचाऱ्याचे नाव खेमकांत नारायण नाईक (वय 50) असे असून तो मडकईत राहणारा होता. जखमींची नावे साई महाले (काणकोण) व बाबासाहेब सांगले अशी आहेत. सांगले हे मूळ बेळगावचे आहेत. जखमींना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
नौदल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नौदलाच्या वरूणापुरी गेटपासून साधारण तीनशे मीटर अंतरावर ही घटना घडली. या ठिकाणी प्रवेश थांबा असून येणाऱ्या, जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद या थांब्यावर होत असते. सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी ही दुर्घटना घडली. या थांब्याजवळच नेदलाचे एअर क्राफ्ट यार्ड आहे. या यार्डच्या इमारतीच्या बाहेरील काँक्रिटच्या छताचा भाग अचानक कोसळला. काही कर्मचाऱ्यांपैकी तिघेजण या काँक्रिट स्लॅबखाली सापडले. खेमकांत यांच्यावर स्लॅब कोसळताच डोक्यात लोखंड घुसल्याने त्याला जागीच मृत्यू आला. जखमी साई महाले याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. सांगले याच्या डोक्याला मार लागलेला आहे. या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असून ते गोमेकॉमध्ये उपचार घेत आहेत.
नौदलाच्या एअर क्राफ्ट यार्डचे छत कोसळताच घटनास्थळी धावपळ सुरू झाली. नौदलाच्या माणसांनीच तिन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यांना प्रथम नौदलाच्या जीवंती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी खेमकांत नाईक याला मृत घोषित करण्यात आले. मयत कर्मचारी रोज मडकईतून वास्कोला ये जा करीत असे. त्याचा मृतदेह हॉस्पिसियोमध्ये ठेवण्यात आला आहे. वास्को पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलेला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार नौदल क्षेत्रातील हवाई यार्डाची ही इमारत पन्नास वर्षे जुनी असून तिची स्थिती धोकादायक बनलेली आहे. त्यामुळे नौदलाने या इमारतीच्या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याचा व हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे.









