बिहारमध्ये सारण लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 जण जखमी झाले आहेत. सारण शहराच्या बडा तेल्मा भागात हा हिंसाचार मंगळवारी झाला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल या दोन पक्षांचे कार्यकर्ते परस्परांमध्ये भिडल्याने हा हिंसाचार झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे.
मृत झालेल्या व्यक्तीचे नाव चंदन यादव असे असून जखमींच्यावर उपचार होत आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तीन दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात इंटरनेट पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी पत्रकारांना दिली. सारण मतदारसंघात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य या राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार राजीव प्रताप रुडी यांना उमेदवारी दिली आहे. येथे 20 मे या दिवशी मतदान पार पडले होते. हिंसाचार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घडविला, असा आरोप आचार्य यांनी केला आहे.









