वाहनातील गायीचाही मृत्यू
बेळगाव : भरधाव गुड्स कंटेनर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर चढून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या आयशर वाहनाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले. आयशरमधील आठ गायीही जखमी झाल्या असून एका गायीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी बडेकोळ्ळमठ क्रॉसजवळ हा अपघात घडला आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंबंधी पुढील तपास करण्यात येत आहे.
जयवंत ज्योतीराम एवारे (वय 44) रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे. महेश दास, रा. जयनगर, जि. कोडेरमा, नारायण चव्हाण, रा. पंजलवाडी, पुणे हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त आयशरमधील दहापैकी आठ गायी किरकोळ जखमी झाल्या असून एका गायीचा मृत्यू झाला आहे. आणखी एका गायीची प्रकृती चिंताजनक आहे. गुड्स कंटेनर बेळगावहून धारवाडकडे जात होता. बडेकोळ्ळमठ क्रॉसजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर चढून कंटेनर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला. याचवेळी धारवाडहून बेळगावकडे येणाऱ्या आयशर वाहनाला कंटेनरची धडक बसली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. महेश दास हा कंटेनर चालवत होता. तो स्वत:ही या अपघातात जखमी झाला आहे.









