प्रतिनिधी/ फोंडा
पेटके-धारबांदोडा येथे मालवाहू कंटेनर व कारगाडीच्या झालेल्या अपघातात तिघेजण चिरडले. या भिषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. यश मोहनदास नाईक (18, हळदय-शिरोडा) असे त्याचे नाव आहे. तर चालक दत्तराज तुकाराम गावडे (28, नळकाडे, पालवाडा-उसगांव) व युवती शिवानी राव (उसगांव) दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना काल रविवारी सायंकाळी 7.30 वा. सुमारास घडली. मोले-बेळगांव महामार्ग सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तराज गावडे आपल्या स्वीफ्ट जीए 05 एफ 1348 कारगाडीने आपल्या अन्य दोन मित्रासह धारबांदोडय़ाहून उसगांवच्या दिशेने येत होता. संजीवनी साखर कारखान्याजवळील पेटके धारबांदोडा येथे पोचला असता भरघाव वेगाने आलेल्या मालवाहू केए 52 ए 5699 कंटेनरच्या चालकाचा वाहनावरील ताबा गेला व सरळ धडक स्वीफ्ट कारला बसली. यामध्ये दत्तराज कारमधून बाहेर फेकला गेला, अन्य दोघेजण कारमध्ये अडकले. यश नाईक याला फोंडा उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच कंटेनर उलटल्याने कंटेनर चालक लकराज गौडा (38, बंगळूर) व देवरान एन (35) दोघेही गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सुरज काणकोणकर अधिक तपास करीत आहे.
फोंडा अग्निशामक दलाचे मदतकार्य
रविवार-सोमवार एकंदर दोन दिवस सुट्टी असल्याने महामार्गावर वाहतूकीची वर्दळही जास्त होती. पेटके धारबांदोडा येथील वळणावर कंटेनर चालकाचा ताबा गेल्याने सरळ धडक स्वीफ्ट कारला बसली व त्यानंतर कारगाडीवर कंटेनर उलटला. धडक एवढी जबरदस्त होती की कारगाडीचा चक्काचूर झाला असून कारगाडीचे सीट जंगलात झाडीत फेकले गेले आहे. वाहनात अडकलेल्या युवतीला घटनास्थळावरील लोकांना बाहेर काढले तर दुसऱयाला फोंडा अग्निशामक दलाच्या जवानानी बाहेर काढले. यश नाईक हा आई वडीलांचा एकुलता मुलगा आहे. तो उसगांव येथील मावशीच्या घरी गेला होता. त्यानंतर मित्रांनी मिळून हा बेत आखला होता. मयत यशचे वडील आरोग्य खात्यात कामाला आहे. सदर घटनेमुळे वाजे शिरोडा भागात शोककळा पसरली आहे.









