एमआयएम नेत्याचे हिंदूंविरोधात अवमानजनक वक्तव्य
@ लखनौ / वृत्तसंस्था
‘हिंदू पुरुष एका महिलेशी लग्न करतो, पण त्याने तीन बायका ठेवलेल्या असतात,’ असे अत्यंत अपमानजनक वक्तव्य एमआयएमच्या नेत्याने जाहीर सभेत केले आहे. या नेत्याचे नाव शौकत अली असे आहे. तो उत्तर प्रदेशातील संबळ येथे जाहीर सभेत भाषण करीत होता. त्याच्या भाषणावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून हिंदूंमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
मुस्लीम पुरुष तीन विवाह करतो असे बोलले जाते. तथापि, आम्ही आमच्या सर्व बायकांना समान सन्मान देतो. पण हिंदू पुरुष एकाच महिलेबरोबर विवाह करतो. मात्र त्याने तीन बायका ठेवलेल्या असतात. तो गुप्तपणे त्यांच्याशी संबंध ठेवतो. त्यामुळे तो आपली पत्नी आणि आपल्या रखेल्या यांपैकी कोणाचाही सन्मान ठेवत नाही. मुस्लीम पुरुष मात्र, आपल्या सर्व बायकांना आपले नाव देतो. त्यांच्या मुलांनाही आपले नाव देतो आणि त्यांची रेशन कार्डेही काढतो, अशी मुक्ताफळे या नेत्याने उधळली आहेत. हिजाब प्रकरणावरही त्याने प्रक्षोभक विधान केले. भाजप हा पक्ष मुस्लीमांवर आक्रमण करीत आहे. मुस्लीमांवर आक्रमण करणे त्याला सोपे वाटते. पण भाजपने लक्षात ठेवावे, की मुस्लीमांनी या देशावर 832 वर्षे राज्य केले आहे. त्यावेळी हिंदूंना मुस्लीम सत्ताधीशांसमोर हात पाठीशी बांधून आणि कमरेत वाकून ‘जी हुजूर’ असे म्हणावे लागत होते, अशी दर्पोक्ती त्याने केली.









