देवगड / प्रतिनिधी
जामसंडे बाजारपेठ येथील अनिकेत रामचंद्र लाड या संशयिताने सुमारे ३७ हजार ८४४ रूपये किंमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा करून तो विक्री करण्याच्या उद्देशाने दुकानात लपवून ठेवल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. देशमुख यांनी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने देवगड येथील ॲड. कौस्तुभ मराठे यांनी यशस्वी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. आशिष लोके यांनी सहाय्य केले.जामसंडे बाजारपेठ येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात अनिकेत लाड या संशयिताकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दुकानात लपवून ठेवलेले आढळले होते. हा अवैध साठा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. दाखल फिर्यादीनुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संशयिताच्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या संशयिताच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी घेत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने संशयिताला अंतरिम जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात अन्य संशयित असण्याची शक्यता असून घटनेचा तपास देवगड पोलिसांकडून सुरू आहे.









