खेड :
किरकोळ वादातून सहकाऱ्याचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रुपेश राजबहादूर कारकी (२८, मूळ गाव, झापा-नेपाळ)असे या आरोपीचे नाव आहे. चार वर्षापूर्वी चिंचघर-वेताळवाडी येथे खूनाचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानुसार खेड पोलिसांनी रुपेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
खेड अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्यातील माहितीनुसार, २१ मार्च २०२० मध्ये त्याने राजू लक्ष्मण मोरे या सहकामगाराचा खून केला होता. रूपेश कारकी हा चिंचघर- वेताळवाडी येथील हॉटेल राजकमल ऍग्रो टुरिझम येथे कामास होता. याच ठिकाणी राजू मोरे हा देखील कामास होता. २१ मार्च रोजी दोघांमध्ये बोलचालीवरून झटापट झाली. या झटापटीत त्याने खून केला होता. मृतदेहावर माती आणि पालापाचोळा टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या बाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासातच संशयिताच्या मुसक्या आवळल्या होत्या. या खटल्याची सुनावणी झाली असता १७ साक्षीदार तपासण्यात आले सरकारी वकील नितीन धोंगडे, ऍड. मेघना नलावडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राश्य धरत मारेकऱ्याास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेचाही समावेश असून दंड न भरल्यास साध्या कारावासाच्या शिक्षेचाही समावेश आहे.








