येळवी प्रतिनिधी
घोलेश्वर (ता. जत) येथील ट्रान्सपोर्ट चालकाचा बिहार येथील फारबिसगंज (पाटणा) येथे द्राक्षांची वाहतूक करताना टेम्पो पलटी झाल्याने मत्यू झाला. चिनगी बादशाह नाईक (वय ४५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्यांच्यासोबत असलेले नसरुदीन महम्मद नाईक (वय ३०) हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी पहाटे घडली. घोलेश्वर येथील नाईक यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. ते महाराष्ट्रातून द्राक्षांची पाटणा येथे वाहतूक करीत होते. दरम्यान, त्यांचा टेम्पो रस्त्याला लागून असलेल्या झाडावर जाऊन आदळला. झाडावर आदळल्याने टेंपो पलटी झाला. यात नाईक हे जागीच ठार झाले. त्यांचे दुसरा सहकारी नसरुद्दीन नाईक हे जखमी झाले. याप्रकरणी फारबिसगंज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. लांबचा पल्ला असल्याने त्यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी घोलेश्र्वर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेने घोलेश्र्वर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.