पंतप्रधान मोदींचा ’ऑनलाईन’ सहभाग, 70 देशांचे प्रतिनिधी समाविष्ट
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या ‘प्रगती मैदान’ येथे ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ (वन अर्थ वन हेल्थ) शिखर परिषदेला प्रारंभ झाला आहे. या परिषदेत 70 देशांचे 500 हून अधिक प्रतिनिधी समाविष्ट झाले आहेत. ही परिषद गुरुवारी समाप्त होणार आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.
जगातील सर्व नागरिकांना आरोग्यसेवांचा समान लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यातील आरोग्य विषयक अंतर कमी करण्याची आवश्यकता असून विश्वसमुदायाने एकत्र येऊन मानवासमोरच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याची आवश्यकता या परिषदेच्या निमित्ताने अनेक तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
भारताचे लक्ष्य, सर्वांसाठी आरोग्य
भारतातील सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे, हे भारत सरकारचे लक्ष्य आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यातूनच सर्वांचे कल्याण साधणार आहे. भारताने नुकताच लसीकरणाचा एक देशव्यापी कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले. तसेच जगाच्या आरोग्य अभियानात आमचेही मोठे योगदान असल्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात भारताने 100 हून अधिक देशांना 30 कोटींहून अधिक लसी पुरविल्या आहेत. यातून भारताची क्षमता आणि प्रतिबद्धता व्यक्त झाली आहे, हामुद्दा त्यांनी त्यांच्या भाषणात विशेषत्वाने विशद केला.
आरोग्य पर्यटनाचे केंद्र भारत
अनेक देशांमधील रुग्ण उपचारांसाठी भारतात येतात. भारतात कोणत्याही आजारावर किंवा व्याधीवर सर्वोत्तम उपचार केले जाऊ शकतात. याच विश्वासाने आज भारतात मोठय़ा प्रमाणात आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजली आहे. भारत आता आरोग्य पर्यटनाचे जागतिक केंद्र होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जी-20 चाच एक भाग
जी-20 परिषदेचे अध्यक्षस्थान सध्या भारताकडे आहे. या परिषदेचा एक भाग म्हणून या शिखर परिषदेचे आयोजन केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण विभाग, तसेच इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी केले आहे. ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 या अभियानाच्या सहाव्या आवृत्तीचाही यात सहभाग आहे. या परिषदेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अनेक बैठकाही होणार
या परिषदेच्या निमित्ताने अनेक विविध देशांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक वन टू वन बैठकाही होणार आहेत. आरोग्य विषयक परस्पर सहकार्य करारही होण्याची शक्यता आहे. या शिखर परिषदेला आफ्रिका, मध्यपूर्व, राष्ट्रकुल, सार्क आणि आसियान संघटनांच्या 70 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहिलेले आहेत.









