शहला रशिदला ‘नवे काश्मीर’ पसंत : मोदी सरकारचे केले कौतुक
वृत्तसंस्था/ श्रीनगर
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम-370 हद्दपार केल्यावर देशविदेशातून विरोधाचे सूर उमटले होते. परंतु या निर्णयाच्या सुमारे 4 वर्षांनी आता काश्मीर खोऱ्यात शांतता अन् स्थैर्याचे वारे वाहू लागल्याने लोक आता मोदी सरकारचे कौतुक करत आहेत. मोदी सरकारची कडवी टीकाकार शहला रशिद देखील आता मोदी सरकारची प्रशंसा करत आहे.
जेएनयू विद्यार्थी संघाची माजी उपाध्यक्ष शहला रशिदने यापूर्वी कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला होता. तिने जाहीरपणे मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. परंतु कालौघात तिचे सूर आता बदलले आहेत. काश्मीरमध्ये मानवाधिकारांची स्थिती सातत्याने सुधारत आहे. वर्तमान सरकारने एकाच प्रयत्नात काश्मिरींच्या ओळखीच्या संकटाला संपविले असल्याचे तिने म्हटले आहे.
काश्मीरमध्ये मानवाधिकारांची स्थिती सुधारली आहे हे निश्चित. नरेंद्र मोदी सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने खोऱ्यातील लोकांचा जीव वाचविण्यास मदत केली असल्याचा माझा दृष्टीकोन आहे. या सरकारने एका क्षणात काश्मिरींसाठी दशकांपासून राहिलेल्या ओळखीच्या संकटाला संपविण्यास यश मिळविले आहे. कलम 370 संपुष्टात आणण्याचा हा सकारात्मक परिणाम आहे का? बहुधा पुढील पिढीला संघर्षाला सामोरे जावे लागणार नाही. बहुधा आता आणखी रक्तपात होणार नसल्याचे शहलाने म्हटले आहे.









