वृत्तसंस्था /सिडनी
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात गुरुवारी एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेला टार्गेट किलिंग ठरविले आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यावर आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आले होते अशी माहिती न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिली. गोळीबाराची घटना दुपारी दोन वाजता घडल्याचे समजते. गोळी लागलेल्या इसमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले हेते, परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. संबधित इसमाचा घटनास्थळीचा मृत्यू झाला होता. मृत इसम सुमारे 20 वर्षांचा असावा असे सांगण्यात आले आहे. न्यू साउथ वेल्समध्ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा टार्गेट किलिंगचा प्रकार घडला आहे. या दोन्ही घटना सिडनीच्या दक्षिण-पश्चिम भागात घडल्या आहेत. बुधवारी एका 31 वर्षीय व्यक्तीवर त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









