पुणे / वार्ताहर :
ॲमेझॉनचा डिलर असल्याचे भासवत एका नागरिकाला वेगवेगळ्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 12 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सांगलीच्या तरुणावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य ऊर्फ अंकित भाऊसाहेब पाटील (वय 34, रा. कळंबी, ता. मिरज, सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उल्हास रामचंद्र शेवाळे (48) यांनी आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सन 2020 पासून 30 मे 2022 दरम्यान हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित पाटील याने तो ॲमेझॉन डिलर असल्याचे उल्हास शेवाळे यांना सांगितले. तक्रारदार राहत असलेल्या उरुळी देवाची परिसरातील शेवाळेवाडीमध्ये बऱ्याच लोकांना स्वस्तात दुचाकी वाहने, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, सोन्याची बिस्कीटे, चारचाकी वाहनांचे टायर अशा अनेक वस्तू उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. संबंधित कालावधी दरम्यान स्वस्तात वस्तू घेवून देतो, असे अमिष दाखवून काही वस्तू स्वस्तात देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच तक्रारदार यांच्या मुलाच्या खात्यावरुन त्या वस्तूंसाठी स्वत:च्या बँक खात्यावर 1 कोटी 12 लाख रुपये ट्रान्सफर करुन आर्थिक फसवणूक केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस तरटे पुढील तपास करत आहेत.









