हे जग अत्यंत अजब प्रकारच्या माणसांनी भरलेले आहे. कोणाला कोणता छंद असेल आणि तो जोपासण्यासाठी ही माणसे काय करतील, याची शाश्वती देता येणे कठीण आहे. अलिकडच्या काळात टॅटू काढून घेण्याची फॅशन जगभरात चांगलीच बोकाळली आहे. शरिराच्या शक्य तितक्या भागांवर टॅटू काढून घेतले जातात. आपल्या जीवनातील उपलब्धींचे चिरकाल स्मरण रहावे, यासाठी अनेकजण आपल्या शरीरावर त्या उपलब्धींचे टॅटू काढून घेतात, तर काहीजण आपली रहस्ये सांकेतिक रितीने अशा टॅटूंच्या माध्यमातून आपल्या शरीरावर गोंदवून घेतात.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातल्या एक महिला 65 वर्षीय एलिझाबेथ ब्यूवाईज यांचे टॅटू सध्या चर्चेचा विषय झालेले आहेत. त्यांनी आपल्या शरिरावर इतके टॅटू काढले आहेत की कोणालाही आश्चर्य वाटावे. तथापि, या बाई केवळ त्यांच्या अंगावरील टॅटूंच्या संख्येसाठीच प्रसिद्ध नाहीत, तर या टॅटूंसाठी त्यांनी जो पैसा खर्च केला आहे, तोही चर्चेचा विषय झाला आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल एक कोटी रुपये खर्च यासाठी केला आहे. इतका पैसा खर्च करुन इतके टॅटू काढून घेण्याची काय आवश्यकता होती, असा प्रश्न त्यांना अनेकजण विचारतात. अनेकांना हा पैशाचा आणि वेळेचा अपव्यव वाटतो. तथापि, हौसेला मोल नसते, या म्हणीप्रमाणे या बाई अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांनी त्यांचा छंद जोपासला आहे. त्यांनी या टॅटूच्या जगात प्रवेश बराच उशीरा केला. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी प्रथम टॅटू आपल्यावर काढून घेतला. त्यानंतर त्यांना त्याचा नादच लागला. या छंदातून त्यांना कोणताही लाभ होत नाही. उलट पाण्यासारखा पैसा त्यांना आपल्या कष्टाच्या उत्पन्नातून खर्च करावा लागता. पण काही केल्या त्यांना त्यांची ही हौस गप्प बसू देत नाही, असे त्या स्वत:च स्पष्ट करतात.
आता इतके टॅटू त्यांनी का काढून घेतले आहेत, या मागचे कारण मात्र विचार करायला लावणारे आहे. शिक्षिका म्हणून त्या सेवेत होत्या निवृत्त होण्याच्या वेळेला त्यांना अंमली पदार्थांचे व्यसन लागले. ते इतके बळावले की त्यांची प्रकृती ढासळली. त्यानंतर या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी वैद्यकीय उपचार करुन घेतले. त्यांचे व्यसन सुटले. या व्यसनमुक्तीची आठवण चिरस्थायी रहावी, म्हणून त्यांनी इतके टॅटू काढून घेतले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहेत. आठ वर्षांपूर्वी त्या व्यसनमुक्त झाल्या. व्यसनमुक्तीचे प्रतीक मानल्या गेलेल्या आकृत्याच त्यांनी त्यांच्या शरीरावर टॅटूच्या स्वरुपात गोंदवून घेतल्या आहेत. जेव्हा त्यांनी हा रहस्यभेद केला, तेव्हापासून त्यांचे टीकाकारही त्यांचे प्रशंसक बनले आहेत.









