कराड :
सातारा येथे शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या प्रसंगावधानाने फसला. ही घटना ताजी असतानाच कराड तालुक्यातील एका गावात 22 जुलै रोजी एका अवघ्या चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायदा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना पीडितेच्या घराजवळच घडल्याची माहिती असून संशयिताने मुलीच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत अत्याचार केला. फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने पीडितेला बहाण्याने आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अश्लील वर्तन केले. पीडित मुलीला दुखापत झाल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाईच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या.








