बनावट नोटा प्रकरणात मास्टरमाइंड अभिजीत पवार अटकेत
कोल्हापूर : एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करुन विक्री प्रकरणी गांधीनगर येथून आणखी एकास अटक केली. बनावट नोटांचे डिझाईन तयार करुन देणाऱ्या अभिजीत राजेंद्र पवार (बय ४०, रा. शांतीनगर, गांधीनगर) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सांगली आणी गांधीनगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.
अभिजीत हा नोटांचे डिझाईन तयार करण्यातील मास्टरमाईंड असून, त्याच्यावर यापूर्वी गांधीनगर व कळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पाचशे, दोनशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीचा मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी मिरज पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत अभिजीत पवार याचे नाव समोर आल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याची कुंडली तयार केली. यानंतर कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून अभिजीतला मंगळवारी दुपारी गांधीनगर येथून अटक केली. अभिजीतने हुबेहुब ५०० व २०० रुपयांच्या नोटांचे डिझाईन तयार करुन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या घरातून लॅपटॉप आणि काही साहित्य जप्त केले आहे. सांगली पोलिसांनी गांधीनगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
कारागृहात ओळख
मिरज येथील बनावट नोटा प्रकरणातील राहुल जाधव (रा. कोरोची) हा गांजा तस्करीप्रकरणी कारागृहात असताना त्याची ओळख अभिजीत पवार याच्या सोबत झाली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे यांच्या मदतीने बनावट नोटा तयार करण्याचे ठरविले होते.
खेळणी दुकान ते बनावट नोटा
अभिजीत पवार याचे राजारामपुरी परिसरात खेळणी विक्रीचे दुकान होते. काही काळ हे दुकान चालविल्यानंतर यातून पुरेसा पैसा मिळत नसल्यामुळे त्याने बनावट नोटा छापण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. यातूनच त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.








