कोल्हापूर
मोक्याच्या गुन्ह्यात फरार काळात सम्राट कोराणेला आर्थिक रसद पुरविणाऱ्या आणखीन एकास पोलिसांनी अटक केली. धनंजय उर्फ बबल्या नानासाहेब देसाई (वय ३१ रा. मंडलिक वसाहत, मंगळवार पेठ) असे त्याचे नांव आहे. सोमवारी सकाळी धनंजयला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मटकाकिंग सम्राट सुभाष कोराणे (रा. वेताळमाळ, तालीमजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) हा मोक्याच्या गुन्ह्यात सुमारे सहा वर्षे फरारी होता. तो ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात स्वत:हून हजर झाला. न्यायालयाच्या आदेशाने अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून, या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस उपाअधीक्षक अजित टिके करत आहेत. फरार काळात कोराणे हा वाशी (नवीमुंबई) येथील एका अपार्टमेंट मधील प्लॅटमध्ये आश्रयास होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सम्राट तत्काळ मुंबईला पसार झाला. यानंतर कोरोना काळात सम्राट तीन वर्षे मुंबई येथे अडकून राहिला होता. या काळात त्याला आर्थिक मदत कोणी केली, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नवी मुंबई (वाशी) येथील फ्लॅट वाडीचरण येथील उत्तम मोरे याचा असून त्याने तो सम्राटला भाड्याने दिला होता. तसेच फरार काळात सम्राटला कोल्हापूरातून १६ लाख ५० हजार रुपये पाठविण्यात आले होते. विजेंद्र उर्फ सोन्या विश्वनाथ कोराणे याने यापैकी काही रक्कम सम्राटला पाठविली होती. यामुळे १६ फेब्रुवारी रोजी सोन्या कोराणे व उत्तम मोरे या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीमधून धनंजय उर्फ बबलू देसाई याचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी रविवारी रात्री धनंजयलाही अटक केली. सम्राटला पैसे पाठविणाऱ्या सोन्या कोराणे याला धनंजयने रक्कम दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यानुसार त्याला अटक करण्यात आली.
आज तिघांना न्यायालयात हजर
सम्राट कोराणेला न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तर उत्तम मोरे आणि विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे या दोघांनाही न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. या तिघांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने तिघांनाही मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पत्नी, सासरा, सासूकडे चौकशी
धनंजय देसाई याने सम्राट कोराणे याला आर्थिक रसद पुरवण्यासाठी पैसे विजेंद्र कोराणे याच्यामार्फत पाठविल्याची माहिती समोर आली आहे. त्याने हा पैसे कोठून गोळा केला याची चौकशी धनंजय देसाई याच्याकडे सुरू आहे. सोमवारी शहर पोलीस उपअधिक्षक अजित टिके यांनी धनंजय देसाई याची पत्नी, सासू, सासरा यांच्याकडे दिवसभर चौकशी केली.
त्या १२ जणांकडे पुन्हा चौकशी
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी रविवारी दिवसभर सम्राटशी संबंधीत १२ जणांकडे चौकशी केली होती. यामध्ये अभि खतकर, महेश पाटील, मयुर देसाई, भाट, यांच्यासह अन्य साथीदारांचा समावेश आहे. या १२ जणांकडे पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अभी खतकर, महेश पाटील, मयुर देसाई यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येणार आहे.








