इस्लामपूर :
येथील बसस्टँड परिसरात विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी जिलानी मकबुल नरगुंद (रा. चाँद कॉलनी म्हैशाळ रोड मिरज ता. मिरज) यास इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ७० हजार रुपयेचे काळ्या रंगाचे लोखंडी पिस्टल हस्तगत केले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांना पेट्रोलींग करताना गोपनियरित्या मिळालेल्या माहितीनुसार एक इसम एस.टी. बसस्थानकात पिस्टल घेवून फिरत असून त्याची झडती घ्यावी, असे सांगण्यात आले. दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चौकशी केली असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी पकडून झडती घेतली असता त्याच्या डाव्या बाजूस पिस्टल खोवलेले दिसून आले. त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली.
पोलीसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले असता, त्याने त्याचे नाव जिलानी मकबुल नरगुंद असून तो मिरज येथील असल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडून हस्तगत केलेली ७० हजार रुपयेची पिस्टल असून त्यावर ‘ओन्ली फॉर आर्मी’ असे लिहिले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, निरिक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद जाधव, अरुण कानडे, अमोल सावंत, दिपक घस्ते, विशाल पांगे, शशिकांत शिंदे यांनी केली.








