घरातील लोकांनी बेशुद्ध अवस्थेत तिला पाण्यातून बाहेर काढले.
सांगरूळ : घरापाठीमागे असणाऱ्या पाण्याच्या खड्यात पडून आमशी (ता. करवीर) येथील स्वामिनी संतोष सातारे या दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. स्वामिनीच्या चुलत्याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या घराच्या चौकट पूजनाचा आज कार्यक्रम होता.
सर्वजण या कार्यक्रमात व्यस्त असताना स्वामिनी सर्वांची नजर चुकवून घरापाठीमागे असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्याजवळ गेली व ती त्या खड्यात पडली. घरातील लोकांनी बेशुद्ध अवस्थेत तिला पाण्यातून बाहेर काढले. गावातील खाजगी दवाखान्यात नेले असता त्यांनी पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे जाण्यास सांगितले.
कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही महिन्यापूर्वीच स्वामिनीचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला होता. स्वभावाने प्रेमळ असणाऱ्या व सर्वांना लळा लावणाऱ्या चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वामिनीच्या आई वडिलांनी फोडलेला हंबरड्याने सर्वांचे काळीज पिळवटून टाकले. या घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनमध्ये झाले असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीद व पोलीस कॉन्स्टेबल वाकरेकर करत आहेत.








