इस्रायलने मिळविला पूर्ण प्रदेश : गाझात प्रवेशासाठी सज्ज
► वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायलच्या दक्षिण भागात अचानक घुसून 800 हून अधिक निरपराधी नागरिकांची हत्या आणि महिलांवर अमानुष बलात्कार करणाऱ्या दीड हजारांहून अधिक हमास दहशतवाद्यांना इस्रायली सैनिकांनी कंठस्नान घातले आहे. या सर्वांचे मृतदेह इस्रायलच्या भूमीत आहेत, असे प्रतिपादन इस्रायलच्या सैनिकी प्रवक्त्याने केले आहे. दुसरीकडे इस्रायलची सेना आता गाझा पट्टीत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. 3 लाखांहून अधिक राखीव सैनिकांनाही बोलाविण्यात आले आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी काही काळ ताब्यात घेतलेला दक्षिण इस्रायलमधील सर्व प्रदेश आता इस्रायली सैन्याने मोकळा केला असून गाझापट्टीला लागून असलेल्या सीमारेषेवर इस्रायलचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यात आल्याचेही प्रवक्त्याने स्पष्ट केले. सोमवारच्या रात्रीपासून एकही हमास दहशतवादी इस्रायलमध्ये घुसलेला नाही, असे स्पष्टीकरण सैन्याचे प्रवक्ते रिचर्ड हॅचेट यांनी केले आहे.
सीमेकडील प्रदेश केला रिक्त
गाझापट्टीला लागून असलेल्या सीमेजवळील सर्व नागरिकांना आतल्या भागात हलविण्यात आले असून ते पूर्णत: सुरक्षित आहेत. इस्रायलने गेले तीन दिवस जोरदार बाँबवर्षाव करुन हमासची गाझापट्टीतील अनेक स्थाने उद्ध्वस्त केली आहेत. यामध्ये हमासच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. हमासकडून अद्यापही घुसखोरी होण्याची शक्यता गृहित धरुन दक्षता घेण्यात येत आहे.
पळून जाण्याचे आवाहन
जे शांतताप्रिय पॅलेस्टाईनी नागरिक आहेत, त्यांनी गाझापट्टीतून त्वरित सुरक्षित स्थानी पळून जावे. शक्यतोवर त्यांनी इजिप्तचा मार्ग धरावा, अशी सूचना त्यांना सोशल मीडियावरुन करण्यात आली आहे. पॅलेस्टाईन नागरिकांनी राफाच्या प्रवेशद्वारातून जावे, असे आवाहन इस्रायली सैनिक प्रवक्त्याने केले.
हमास दीर्घ युद्धासाठी तयार
हमास इस्रायलशी दीर्घकालीन युद्ध करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले. इस्रायलला आम्ही धडा शिकविला आहे. तसा आणखी शिकविण्याची आमची तयारी आहे. हमासकडे बराच काळ पुरेल इतक्या अग्निबाणांचा साठा असून त्याचा उपयोग इस्रालयविरोधात केला जाईल. आम्ही माघार घेणार नाही, असेही या हस्तकाने स्पष्ट केले.
इराण, हेजबुल्ला समाविष्ट होणार
इस्रायलने गाझापट्टी पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास या युद्धात इराण आणि लेबेनॉनमधील हेजबुल्ला ही संघटनाही युद्धात समाविष्ट होईल, अशी धमकी हमासने दिली आहे. इस्रायलच्या सेनेला आम्ही नमवू शकतो, असा विश्वास आम्हाला वाटतो असेही वक्तव्य म्होरके बराकेह यांनी केले आहे.
अपहृत महिलांची विवस्त्र धिंड
हल्ल्यानंतर अपहरण करुन गाझापट्टीत नेण्यात आलेल्या इस्रायली महिलांची तसेच काही विदेशी महिलांची विवस्त्र धिंड रस्त्यांवरुन काढण्यात आल्याचे वृत्त आहे. या संबंधीचे काही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. एका जर्मन महिलेचीही अशीच धिंड काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे हमासने जगाची सहानुभूती गमावली असून केवळ काही विकृत मनोवृत्तीचे लोकच हमासचे समर्थन करु शकतात, अशी जागतिक प्रतिक्रिया आहे. निरपराध महिलांवर अशा प्रकारे अत्याचार करुन आणि बालकांची निर्घृणपणे हत्या करुन आनंद साजरा करणाऱ्या हमासने स्वत:चे मरणच ओढवून घेतले आहे, अशीही प्रतिक्रिया आहे.
तर ओलिसांना ठार करू
गाझापट्टीवरील हल्ले इस्रायलने थांबविले नाहीत, तर आमच्या ताब्यातील सर्व ओलिसांना त्वरित ठार करण्यात येईल, अशीही धमकी हमासने दिली आहे. इस्रायलचे 23 सैनिक आणि 100 हून अधिक नागरिक, तसेच 50 हून अधिक विदेशी नागरिक यांचे अपहरण हमासने शनिवारच्या हल्ल्यात केले असून त्यांचा उपयोग इस्रायलवर दबाव आणण्यासाठी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
इस्रालय गाझावर आक्रमण करणार
गाझापट्टीत शिरुन हमासचा नायनाट करण्याखेरीज आता आमच्यासमोर पर्याय उरलेला नाही. आम्हाला हे करावेच लागणार आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशी त्यांची दूरध्वनीवरुन चर्चा झाली. त्यावेळी अमेरिकेकडून पूर्ण साहाय्याचे आश्वासन बायडेन यांनी दिले. अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका आता भूमध्य समुद्रात आणली आहे. अमेरिका इस्रायलला क्षेपणास्त्रे आणि युद्ध विमानेही पुरविणार आहे. 8 अब्ज डॉलर्सचे साहाय्य दिले जाणार आहे.
युद्ध आणखी भडकणार…
ड हमासला पूर्ण संपविण्यासाठी इस्रायल सज्ज, गाझावर हल्ला करणार
ड इस्रायली विमानांच्या बाँबवर्षावात गाझापट्टीचा मोठा भाग उद्ध्वस्त
ड इस्रायलमध्ये घुसलेले सर्व हमास दहशतवादी ठार केल्याचे प्रतिपादन
ड इस्रायलकडून राखीव सैनिकांना बोलावणे, केव्हाही गाझात घुसणार









