वाहतूक पोलीस-दोन तरुणांचा चांगुलपणा : बँकेत डिपॉझिट करण्यासाठी खिशात होते अडीच लाख
प्रतिनिधी/ बेळगाव
एका तरुणाच्या खिशातून रस्त्यावर पडलेले दीड लाख रुपये वाहतूक पोलीस व दोघा तरुणांनी प्रामाणिकपणे संबंधितांना परत केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या दुर्मीळ प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
पाटील गल्ली परिसरात ही घटना घडली आहे. फुलबाग गल्ली येथील अभिषेक मुचंडीकर हे आपल्या जॅकेटच्या खिशात अडीच लाख रुपये घेऊन ते डिपॉझिट करण्यासाठी आरपीडी सर्कलला गेले होते. मशीन बंद असल्यामुळे डिपॉझिट न करताच ते घरी परतले. ज्या खिशात नोटांचे बंडल ठेवले होते, त्याच खिशात त्यांनी मोबाईलही ठेवला होता.
खिशातील मोबाईल काढताना एका खिशातील दीड लाख रुपये खाली पडले. त्याचवेळी याच रस्त्यावरून जाणारे किरण सूर्यकांत पवार, राहणार ताशिलदार गल्ली, पवन गोपाळ बेळगावकर, राहणार बस्तवाड या दोन तरुणांनी पैशांची बंडले खाली पडल्याचे पाहिले. त्यांनी अभिषेकला हाक मारली. तरी तो थांबला नाही.
या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सुगमा-2 मोटारसायकलवरून फोर्ट रोड, पाटील गल्ली परिसरात फिरणारे वाहतूक उत्तर विभागातील पोलीस योगेश तळेवाड यांनीही हा प्रकार पाहिला. तोपर्यंत किरण व पवन यांनी पैशांची बंडले उचलून आपल्याजवळ ठेवली. योगेश तळेवाड यांनी त्यांना काय झाले? असे विचारताच मोटारसायकलवरून गेलेल्या तरुणाच्या खिशातून नोटांची बंडले पडल्याचे सांगितले.
त्यानंतर वाहतूक पोलीस व ते दोन्ही तरुण मोटारसायकलवरून पाठलाग करीत फुलबाग गल्ली गाठली. दोन तरुणांपैकी एकटा अभिषेकला ओळखत होता. त्यांच्या घरी जाऊन योगेश तळेवाड यांनी अभिषेककडे पैशासंबंधी विचारणा केली. आपण डिपॉझिट करण्यासाठी गेलो होतो, असे अभिषेकने सांगताच जॅकेटमधील पैसे कुठे पडले? अशी विचारणा करण्यात आली. पैशांची बंडले त्याच तरुणाची असल्याची खात्री पटताच योगेश तळेवाड, किरण आणि पवन यांनी त्याच्याकडे सुपूर्द केली. पोलीस व दोन तरुणांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
योगेश तळेवाड यांचा धाडशीपणा…
योगेश तळेवाड हे सध्या वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात सेवा बजावतात. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात कार्यरत असताना आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश पाटील याच्यावर झडप घालून झाडशहापूरजवळ त्याला अटक केली होती. हातात चाकू घेऊन घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकाशला योगेश व त्यांच्या आणखी एका साथीदाराने पकडले होते. यावेळी झटापटही झाली होती. मूळचा बेळगावचा असणारा प्रकाश पाटील सध्या गोव्यात असतो. केवळ महाराष्ट्र, कर्नाटक व गोवाच नव्हेतर अनेक राज्यात त्याच्यावर चोरी प्रकरणे दाखल झाली आहेत. अशा आंतरराज्य गुन्हेगाराला योगेश यांनी मोठ्या धाडसाने पकडले होते.









