नवी दिल्ली :
पीएलआय योजनेंतर्गत विविध उद्योगांची उभारणी भारतामध्ये होत असून आगामी काळामध्ये या माध्यमातून दीड लाख नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चीननंतर आता भारतामध्ये कारखाना स्थापन करण्यासाठी परदेशातील विविध कंपन्या तयार झाल्या असल्याचे अलीकडच्या काही काळामध्ये दिसून आले आहे.
भारताने अलीकडच्या काळामध्ये मोबाईल निर्मितीमध्ये मोठी आघाडी घेतली असून पीएलआय योजनेंतर्गत मोबाईल निर्मितीतील विविध कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत. मोबाईल निर्मिती प्रक्रियेच्या माध्यमातून आगामी काळामध्ये दीड लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आर्थिक वर्षामध्येच सदरच्या उमेदवारांची नेमणूक होणार असून 30 हजार ते 40 हजार नोकऱ्या या थेट पद्धतीने उपलब्ध होतील. फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगॉट्रॉन यांच्यासोबत टाटा ग्रुप सॅलकॉम, सॅमसंग, नोकिया या कंपन्या आगामी काळामध्ये भारतामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतात, अशीही माहिती देण्यात आली आहे.









