गोसावी घराण्यात जपली जाते अनोखी परंपरा !
नीलेश परब / न्हावेली
दीड पाच सात नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहित आहे मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करुन नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरु आहे. मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दोनशेहूनही अधिक वर्षे ही दीड दिवसाची नागपंचमी साजरी होत आहे विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे.पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेमभावना निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही या नागपंचमी सणाकडे पाहिले जाते.शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करुन नागपंचमी साजरी केली जाते मातीच्या नाग प्रतिमेचे पूजन करुन त्याला लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखवला जातो सकाळी मूर्ती आणून दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास आरती व भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अळवाच्या पानावर विसर्जन केले जाते. मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फण्याची प्रतिमापूजन करुन नागपंचमी साजरी करण्यात येते .वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा कै. शांताराम बंडू गोसावी व कै. रामचंद्र बंडू गोसावी यांच्यानंतर ही परंपरा त्यांचे मुलगे धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतिश रामचंद्र गोसावी,चंद्रकांत बाबी गोसावी व त्यांचे कुटुंबीय जतन करीत आहे.
नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन व एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते नागोबाचे विधिवत पूजन करण्यात येते.दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो सांयकाळी अळवाच्या पानात नागाचे विसर्जन केले जाते.विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटप केला जातो.
महिलांचा ओवसा फुगड्या कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीला वारुळच्या देखाव्यामध्ये सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षक अशी सजविण्यात आली.त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात आले. दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला.दुपारी गोसावी घराण्यातील महिलांचा ओवसा तर सांयकाळी भजन फुगड्या आदी कार्यक्रम होणार आहेत.मळगाव तसेच पंचक्रोशीतील भाविक सकाळपासूनच उपस्थित दर्शवून नागोबाचे दर्शन घेत आहेत मंगळवारी नागोबाचे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात अळवाच्या पानात विसर्जन केले जाणार आहे.









