गणेशोत्सवावर परिणाम होण्याची शक्यता, आगामी चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी
पणजी / विशेष प्रतिनिधी
गोव्यात ऑगस्ट अखेर 156 इंच पावसाची नोंद झाली असून ऑगस्टमध्येच 33 इंच पाऊस झाला. गेल्या 25 वर्षांतील हा एक रेकॉर्ड असून वाळपईत 31 ऑगस्टपर्यंत विक्रमी 200 इंच पावसाची नोंद झाली. आता पावसाळी मोसम अधिकृतरित्या संपण्यास 30 दिवस शिल्लक असून राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे. त्याचा गणेश उत्सवावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांत एक इंच एवढी पावसाची नोंद झाली तर मौसमात 31 ऑगस्ट दरम्यान आतापर्यंत 156 इंच एवढा पाऊस झाला. यंदाचा पडलेला पाऊस हा गेल्या 25 वर्षांतील सर्वाधिक पाऊस गणला जात आहे. पावसाचा जोर आता ऐन गणेश चतुर्थीमध्ये वाढला असून चतुर्थीच्या काळात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. यंदाच्या मौसमात सर्वाधिक पावसाची नोंद ही वाळपईमध्ये झालेली आहे आणि तिथे 31 ऑगस्ट अखेर 200 इंच पार केलेला आहे. दरवर्षी साधारणत: जून ते 30 सप्टेंबर या दरम्यान गोव्यात सरासरी 110 ते 125 इंच पावसाची नोंद होते मात्र यंदा आतापर्यंत 156 इंचांची विक्रमी नोंद पावसाने नोंदविली आहे. आगामी चार दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे मात्र अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल, त्याचबरोबर जोरदार वादळी वारे वाहत येईल, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या 24 तासात गोव्यात सर्वत्र मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील चार दिवस हे पावसाचे असून पुढील शनिवारी होणाऱ्या गणेशोत्सवा दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद वाळपईत झाली. यंदा ऐन ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडला. एवढा मुसळधार पाऊस सहसा पडत नसतो परंतु यावर्षी पावसाने ऑगस्टमध्ये देखील फारच आक्रमकता दाखवली. पणजीत सर्वाधिक पावणे दोन इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा पाऊण इंच ,पेडणे एक इंच, फोंडा एक सें.मी., पणजी पावणे दोन इंच, जुने गोवे अर्धा इंच, सांखळी एक इंच, वाळपई सव्वा इंच, काणकोण अर्धा इंच, दाबोळी पाऊण इंच, मडगाव पाऊण इंच, मुरगाव दीड इंच, केपे आणि सांगे एक इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी 24 तासात ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून जोरदार पद्धतीने पाऊस पडण्याची शक्यता आहे
दरम्यान, यंदाच्या मौसमात सांगेमध्ये 190 इंच, सांखळीमध्ये 170 इंच, केपेमध्ये 169.50 इंच तर पेडणेमध्ये 160 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. इतर सर्व ठिकाणी पावसाने 150 इंच पार केलेले आहे.









