फोंडा तालुक्यात प्रकार उघडकीस
मडगाव : एप्रिल-मे महिन्यात रेशनकार्डवर पुरविण्यात आलेला तांदूळ खराब झाला होता. तांदळात लोकांना किडे आढळून आले होते. त्यामुळे संपूर्ण गोव्यात खळबळ माजली होती. मात्र, नागरी पुरवठा खात्याने त्यातून कोणताच बोध घेतला नसल्याचे स्पष्ट झाले असून जून महिन्यात फोंडा तालुक्यात पुरविण्यात आलेला तांदूळ खराब झालेला असून या तांदळात देखील किडे आढळून आले आहेत. सासष्टी व मुरगांव तालुक्यात एप्रिल-मे महिन्यात खराब झालेल्या तांदूळ पुरविण्यात आला होता. या तांदळात किडे आडळून आल्याने रेशनकार्ड धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी रेशनकार्डवरील तांदूळ घेण्याचे टाळले होते. दारिद्र्या रेषेखालील रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ मिळत असला तरी तो अनेकांनी उचलला नव्हता. अनेकांनी खुल्या बाजारातून तांदूळ खरेदी केला होता. किडे पडलेल्या खराब तांदळाच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने दखल घेतली व ज्यांनी रेशनकार्डवर खराब तांदूळ घेतला, त्यांना तो बदलून देण्याची घोषणा केली. त्याच बरोबर नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.
एप्रिल-मे महिन्यात जो गोंधळ घालण्यात आला, त्यातून नागरी पुरवठा खात्याने कोणताच बोध घेतला नसल्याने पुन्हा एकदा जून महिन्यात फोंडा तालुक्यात खराब झालेल्या तांदळाची वितरण करण्यात आले. स्वस्त धान्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी तसेच सोसायटांनी आपला कोटा उचलला आणि जेव्हा तांदूळ वितरणास प्रारंभ केला, तेव्हा त्यांना किडे पडलेला खराब तांदूळ आढळून आला. काही ठिकाणी या तांदळाचे वितरण करण्यात आले तर काही ठिकाणी रेशनकार्ड धारकांना तांदूळ दाखवून नंतरच त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. हा खराब तांदूळ पुन्हा नागरी पुरवठा खात्याने घ्यावा व त्याबदली चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवावा अशी मागणी स्वस्त धान्य विक्रेत्यांनी तसेच सोसायटींनी केली आहे. दरम्यान, फोंड्यातील नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षकांनी स्वस्त धान्य विक्रेते तसेच सोसायटींना भेट देऊन खराब तांदळाची माहिती घेण्यास प्रारंभ केलेला आहे. खराब तांदळाचा पुरवठा झाला असावा अशी शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे.









