संततधार पावसाने नदी, नाले तुडुंब : जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह, हिप्परगी ओव्हरफ्लो
► प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला असून आणखी आठ दिवसांत जलाशये भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दररोज सरासरी 25 ते 30 मी.मी. पाऊस होत आहे. काही तालुक्यांमध्ये 50 मी.मी.पेक्षाही अधिक पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलाशयांमध्ये पाण्याचा साठा जमू लागला आहे. यामुळे आता भेडसावत असलेली पाणी टंचाई दूर झाली आहे.
मंगळवारी पावसाची पुन्हा संततधार
सोमवारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. मात्र पुन्हा मंगळवारी सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. यामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले तसेच बैठे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. मंगळवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला होता. दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. दुपारी काही वेळ पावसाने उघडीप दिली तरी सायंकाळी जोरदार सरी कोसळल्या. यामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या साऱ्यांनाच त्याचा फटका बसला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. सतत पडणाऱ्या या पावसामुळे छत्री व रेनकोटचा आधार घ्यावा लागला.
राकसकोप जलाशय तुडुंब भरले असून राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. या जलाशयांमध्ये 2474.50 फुटापर्यंत पाणीपातळी झाली आहे. याचबरोबर कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेज हे पूर्ण क्षमतेने भरले असून आता या जलाशयांमधूनही पाणी विसर्ग करण्यात येत आहे. या जलाशयांमध्ये 1 लाख 2 हजार क्यूसेक येणारे पाणी आता अलमट्टी जलाशयाला सोडण्यात आले आहे.
हिडकल जलाशयात वाढ
हिडकल जलाशयाच्या पाणीसाठ्यामध्येही भरमसाठ वाढ झाली आहे. घटप्रभा नदीवर असलेले हे जलाशय आणखी काही दिवसांत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे घटप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित होत आहे. त्यामुळे हिडकल जलाशयामध्ये पाणीसाठा वाढला असून येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने भरणार आहे. याचबरोबर नवलतीर्थमध्येही पाणीसाठा वाढत आहे. दररोज 19 हजार 106 क्यूसेक पाणी जलाशयामध्ये येत आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या अलमट्टी धरणामध्येही पाणीसाठा तीव्र गतीने वाढत आहे. हिप्परगी धरण पूर्णक्षमतेने भरले असल्यामुळे हिप्परगी धरणाला पाणी देखील अलमट्टी धरणामध्ये वळविण्यात आले आहे. घटप्रभा आणि कृष्णा नदीवर असलेल्या या धरणामध्ये दररोज 1 लाख 16 हजार 263 क्यूसेक पाणी जमा होत आहे. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ही जलाशयेही पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील जलाशयांमध्ये सध्या असलेला पाणीसाठा
| जलाशयांची नावे | एकूण क्षमता टीएमसीमध्ये | सध्या असलेला पाणीसाठा | टीएमसीमध्ये मागील वर्षी असलेला पाणीसाठा | जलाशयांमध्ये दररोज जमा होणारा पाणीसाठा क्यूसेकमध्ये |
| हिडकल | 51 | 21.61 | 33.54 | 34938 |
| नवलतीर्थ | 37.73 | 10.94 | 21.33 | 19106 |
| हिप्परगी | 6 | 6 | – | – |
| अलमट्टी | 123.08 | 54.19 | 82.43 | 116263 |
राकसकोप जलाशयाचे अर्ध्या फुटाने दरवाजे उघडले

तुडये : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत 2474.50 फुटापर्यंत वाढ झाल्याने वेस्टवेअरचे दोन दरवाजे सहा इंचाने (अर्धा फुटाने) उचलण्यात आले आहेत. जलाशयाने आपली पाणीपातळी पूर्ण केली आहे. मार्कंडेय नदीतून पाणी प्रवाह वाढल्याने नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे. जलाशयाला येऊन मिळणाऱ्या पाण्याचा ओघ पाहून दरवाजे उघडण्यात येणार आहेत.









