मासे विक्री, घाऊक मासे विक्रीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन, आश्वासनानंतर रस्ते केले मोकळे
वास्को : वास्को शहरात होणारी घाऊक मासे विक्री बंद करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ वास्को शहरातील मासे मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांनी मुरगाव पालिका इमारतीसमोर बसुन काल बुधवारी मासे विक्री केली. या अनोख्या आंदोलनामुळे वास्को शहरात काल लोकांना वेगळाच प्रकार पाहणे भाग पडले. कारवाईचे आश्वासन मिळाल्याने या मासे विक्रेत्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. वास्को शहरात काही ठिकाणी घाऊक पध्दतीने मासे विक्री करण्यात येते. मागच्या जवळपास दहा वर्षापासून शहरातील मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्या या घाऊक मासे विक्रीला विरोध करीत आहेत. या मासे विक्रेत्यांच्या दबावामुळे पालिका व पोलिसांकडून काही वेळा घाऊक मासे विक्रेत्याविरूध्द कारवाई झालेली आहे. काही वेळा असा व्यवसाय बंद ठेवणेही भाग पाडण्यात आले होते. मात्र, घाऊक मासे विक्रीचा व्यवसाय कायमचा बंद झालेला नाही. याच मागणीवर ठाम राहून मार्केटमधील मासे विक्रेत्यांनी जुने मासळी मार्केट सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळेच नवीन मासळी मार्केट प्रकल्पाच्या कामास बराच काळ व्यत्यय आला होता. अखेर पालिकेने घाऊक मासे विक्री बंद केल्याने मासे विक्रेत्यांनी जुने मार्केट खाली करून त्या ठिकाणी नवीन मासळी मार्केट प्रकल्प उभारण्याची वाट मोकळी करून दिली होती. सध्या या पारंपरीक मासे विक्रेत्यांना शहरातील शासकीय जमीनीवर तात्पुरत्या काळासाठी मार्केट शेड बांधून देण्यात आलेली आहे. मात्र, हल्ली या विक्रेत्यांना घाऊक मासे विक्री तेजीत असल्याचे समजल्याने त्यांनी पुन्हा या प्रकाराविरूध्द आवाज करण्यास सुरवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्या या प्रश्नावर पालिकेवर मोर्चा नेऊन घाऊक मासे विक्री बंद करण्याची मागणी केली होती. अन्यथा पालिका इमारतीसमोर मासे विक्री करण्याचा ईशारा दिला होता. या कारवाईसाठी पालिकेला दिलेली मुदत संपल्याने अखेर काल बुधवारी सकाळी सकाळी मार्केटमधील सर्व मासे विक्रेत्यांनी मासे विकण्यासाठी पालिका इमारतीबाहेर ठाड मांडले. पालिका इमारतीबाहेरच्या दोन रस्त्यांवर ही मासे विक्री सुरू झाली. त्यामुळे मार्केटमध्ये शुकशुकाट राहिला. भर रस्त्यावरील या मासे विक्रीला ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळाला. ग्राहकांचाही नाईलाज झाला. सकाळपासून दुपारपर्यंत रखरखत्या उन्हात बसून मासे विक्रेत्यांनी व्यवसाय केला. त्यामुळे लोकांनाही एक वेगळाच प्रकार पाहणे भाग पडले. काही प्रमाणात गलिच्छता आणि सुरळीत वाहतुक आणि पार्किंगचीही समस्या निर्माण झाली. पोलिसांनी मासे विक्रेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाऊक मासे विक्री विरूध्दच्या आपल्या भुमिकेवर या विक्रेत्या ठाम राहिल्या. दुपारी वास्को पोलीस स्थानकात पोलीस अधिकारी व मासे विक्रेत्यांमध्ये या प्रश्नावर चर्चा झाली. पोलिसांनी त्यांना घाऊक मासे विक्रेत्यांविरूध्द कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे दुपारी साडे बाराच्या सुमारास या मासे विक्रेत्यांनी पालिका इमारतीबाहेरील दोन्ही रस्ते मोकळे केले. मासे विक्रेत्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.









